निशिकांत कामत यांची प्रकृती चिंताजनक, हैद्राबादमधील रुग्णालयात दाखल

मुंबई : मराठमोळे दिग्दर्शक निशिकांत कामत हे हैद्राबादमधील रुग्णालयात दाखल झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. निशिकांत कामत यांना लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रासले आहे. मागील १० दिवसापासून या आजारावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्यामुळे आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. 

दिग्दर्शक निशिकांत कामत यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती अमेय खोपकर यांनी दिली आहे. अमेय खोपकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष आहेत. अमेय खोपकर यांनी सांगितले की, निशिकांत कामत हे गेल्या १० दिवसांपासून हैद्राबादमधील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना लिव्हर सिरोसिस या आजाराने ग्रासले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे. 

निशिकांत कामत यांनी अजय देवगन सोबत ‘दृश्यम’ सिनेमा केला आहे. तर इरफान खानसोबत ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’ हा सिनेमा केला आहे. जॉन अब्राहमसोबत ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ केला आहे. रितेश देशमुख सोबत ‘लय भारी’ तर सुबोध भावे बरोबर ‘फुगे’ सिनेमा केला आहे.