९ जुलैनंतरच पाऊस? तापमानात वाढ

पावसाच्या आगमनानंतर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कमी झालेल्या पावसाला अजूनही पुन्हा सूर सापडलेला नाही. परिणामी उकाड्याचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा मे महिन्यासारखी जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात वाढ जाणवत आहे. त्यामुळे आता पावसाची पुन्हा प्रतीक्षा सुरू झाली आहे.

  मुंबई : जुलैचे सरासरी किमान तापमान २५.५ अंशांच्या आसपास असते. पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानाचा पारा २७ अंश किंवा अधिक राहील अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. या काळामध्ये फारशा पावसाची शक्यता नाही. ९ जुलैनंतर कदाचित पुन्हा पाऊस अनुभवता येईल, असेही पूर्वानुमान आहे.

  पावसाच्या आगमनानंतर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून कमी झालेल्या पावसाला अजूनही पुन्हा सूर सापडलेला नाही. परिणामी उकाड्याचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा मे महिन्यासारखी जाणीव व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून किमान तापमानात वाढ जाणवत आहे. त्यामुळे आता पावसाची पुन्हा प्रतीक्षा सुरू झाली आहे.

  जून महिन्यामध्ये विक्रमी पावसानंतर जुलै महिन्यामध्येही पावसाच्या दिलाशाचा अंदाज वर्तवण्यात आला. कमी कालावधीत मुसळधार पाऊस बरसून महिन्याची सरासरी गाठली जाईलही; मात्र पाऊस नसण्याच्या काळामध्ये तीव्र उष्णतेची जाणीव होत आहे. मुंबईत १ जुलैपासून तापमानामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली. जून अखेरपर्यंत किमान तापमान २६ अंशांपर्यंत पोहोचले होते.

  शनिवार-रविवार दरम्यानची रात्र मुंबईकरांनी आर्द्रता आणि उकाडा या जाणीवेमध्ये घालवली. रविवारी सकाळी ८.३० वाजता झालेल्या नोंदीनुसार कुलाबा येथे २७.२ तर सांताक्रूझ येथे २७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे १.७ आणि १.८ अंशांनी अधिक आहे. शनिवारी कुलाबा येथे किमान तापमानाचा पारा २८ अंशांपर्यंत पोहोचला होता. सरासरीपेक्षा हे तापमान २.५ अंशांनी अधिक होते. सोमवारी मुंबईत कमाल ३३.२ आणि किमान २७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

  कमाल तापमानही वाढले

  केवळ किमान तापमानच नाही, तर मुंबईचे कमाल तापमानही वाढत आहे. जुलैमध्ये सरासरी तापमान ३०.४ अंशांच्या आसपास असते. मात्र सध्या कमाल तापमानाचा पाराही ३२ ते ३३ अंश पार नोंदला जात आहे. मुंबईमध्ये जुलै महिन्याच्या १ तारखेपासून ४ जुलैच्या सकाळपर्यंत कुलाबा येथे अवघा ४.४ मिलीमीटर पाऊस पडला तर सांताक्रूझ येथे ७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.