इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा १० दिवस आंदोलनाचा धडाका : नाना पटोले

महागाई विरोधातील या आंदोलनात उद्या गुरुवारी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूरमध्ये मंत्री नितीन राऊत सुनील केदार यांच्यासह सायकल यात्रा काढणार आहेत. तर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयामध्ये काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटलचे व सेलचे पदाधिकारी विविध आंदोलनात सहभागी होणार आहेत.

    मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मागील ७ वर्षांच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असून उद्या ८ जुलैपासून दहा दिवस विविध आंदोलनाच्या रुपाने मोदी सरकारच्या विरोधात एल्गार करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना कोविड नियमांचे पालन करावे असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

    पदाधिकारी विविध आंदोलनात सहभागी होणार

    महागाई विरोधातील या आंदोलनात उद्या गुरुवारी स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूरमध्ये मंत्री नितीन राऊत सुनील केदार यांच्यासह सायकल यात्रा काढणार आहेत. तर राज्यातील सर्व विभागीय आयुक्तालयामध्ये काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सर्व फ्रंटलचे व सेलचे पदाधिकारी विविध आंदोलनात सहभागी होणार आहेत.

    मोफत गॅसच्या नावाखाली फसवणूक

    टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता ८५० रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही.

    मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल ३० रुपये लिटर व डिझेल २२ रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी १०० रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवले असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून या जुलमी, अत्याचारी सरकारचा निषेध करणार आहे.

     राज्यव्यापी आंदोलनाचा कार्यक्रम

    गुरुवार, दि. ८ जुलै-  सकाळी ११ वाजता सर्व विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी काँग्रेस नेते पदधिकारी व कार्यकर्ते पेट्रोल, डिझेल, गॅसच्या महागाईविरोधात सायकल यात्रा काढून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपूर येथे सायकल यात्रा काढणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे हे ही आंदोलनात सहभागी असतील.

    कोकण विभाग- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान हे नवी मुंबई येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

    पश्चिम महाराष्ट्र विभागात – माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री, विश्वजित कदम प्रदेश कार्याध्यक्ष बस्वराज पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल हे पुणे येथे आंदोलन करणार आहेत.

    अमरावती विभाग- महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील अमरावती येथे आंदलोन करणार आहेत.

    शुक्रवार, दि. ९ जुलै- महिला काँग्रेसचे आंदोलन.
    महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करुन मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतील.

    शनिवार, दिनांक १० जुलै- जिल्हास्तरावर सायकल यात्रा महागाईविरोधात राज्यातील सर्व शहर व जिल्हा पातळीवर सायकल यात्रा काढून केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध केला जाणार आहे.

    रविवार, दिनांक ११ जुलै – सह्यांची मोहिम.
    ११ जुलै ते १५ जुलै दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एनएययुआय, सेवादल, इंटक, सर्व डिपार्टमेंट व सेल यांनी राज्यातील प्रत्येक ब्लॉकमधील पेट्रोलपंपावर इंधन दरवाढीविरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवाली जाणार आहे.

    सोमवार-मंगळवार, दि. १२ व १३ जुलै- ब्लॉक तालुका पातळीवर सायकल यात्रा.
    प्रत्येक ब्लॉक पातळीवर पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती विरोधात किमान ५ किमी सायकल यात्रा काढून पेट्रोल पंपाजवळ विसर्जित केली जाईल

    दिनांक १२ ते १५ जुलै – ब्लॉक पातळीवर महिला काँग्रेस आंदोलन.

    महिला काँग्रेसच्या वतीने प्रत्येक ब्लॉकपातळीवर एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तुंच्या महागाईविरोधात आंदोलन केले जाईल .
    शुक्रवार, दि. १६ जुलै रोजी – राज्य पातळीवर मुंबई येथे महागाई विरोधात सायकल यात्रा.