कस्तुरबा रुग्णालयातील १००  रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतले घरी

मुंबई : अनेक आजारांवर उपचार करणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचा आणखी एक रुग्ण ठणठणीत बरा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. आज याच रुग्णालयातून ''कोरोना कोविड १९'' ने बाधित शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

 रुग्णाने व त्याच्या नातेवाईकांनी मानले  महानगरपालिकेसह कस्तुरबा रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभार

बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये २४ जेष्ठ नागरिकांचा, तर दहा वर्षाखालील ७ बालकांचाही समावेश
मुंबई : अनेक आजारांवर उपचार करणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचा आणखी एक रुग्ण ठणठणीत बरा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.  आज याच रुग्णालयातून ‘कोरोना कोविड १९’ ने बाधित शंभरावा रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. घरी परतण्यापूर्वी निरोप घेताना या रुग्णाने कस्तुरबा रुग्णालयातील अत्यंत सेवाभावाने काम करीत असलेले डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचे व्यक्तिशः आभार मानले आहेत.
 
साधारणपणे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात  महानगरपालिका क्षेत्रात ‘कोरोना कोविड १९’चा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आजपर्यंत कस्तुरबा रुग्णालय हे ‘कोरोना कोविड १९’ने बाधित रुग्णांना अव्याहतपणे सेवा देण्यात अग्रेसर आहे. या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय, कामगार, कर्मचारी शर्तीचे प्रयत्न  करून रुग्णांवर औषधोपचार करीत आहेत.
 
कस्तुरबा रुग्णालयातून आजवर १०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ६० पुरुषांचा आणि ४० महिलांचा समावेश आहे. तसेच यामध्ये ६० वर्षावरील वय असणाऱ्या २४ जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर १० वर्षाखालील ७ बालकांचाही बरे होऊन घरी परतलेल्यांमध्ये समावेश आहे.