महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधून १०२ रुग्ण कोरोनामुक्त;  बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची शतकपूर्ती

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रमुख सर्वोपचार रुग्णालये (मेजर हॉस्पिटल), विशेष रुग्णालये यांच्यासह महापालिकेच्याच उपनगरीय रुग्णालयांमध्ये देखील ''करोना कोविड १९'' बाधित रुग्णांवर प्रभावी औषध उपचार नियमितपणे केले जात आहेत.

  महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयापाठोपाठ उपनगरीय रुग्णालयातूनही १०० पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले 

 
८ बालके आणि १४ ज्येष्ठ नागरिकांसह एकाच कुटुंबातील ६ रुग्णांचाही बरे झालेल्या रुग्णांमध्ये समावेश
 
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेची प्रमुख सर्वोपचार रुग्णालये (मेजर हॉस्पिटल), विशेष रुग्णालये यांच्यासह महापालिकेच्याच उपनगरीय रुग्णालयांमध्ये देखील ‘करोना कोविड १९’ बाधित रुग्णांवर प्रभावी औषध उपचार नियमितपणे केले जात आहेत. या उपनगरीय रुग्णालयांमधून ‘कोरोना कोविड १९’चे १०२ रुग्ण आजवर बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये ४५ स्त्रिया व ५७ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ८ बालकांचा आणि ६० वर्षे वयावरील १४ ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश असून एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींचाही बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे, अशी माहिती उपनगरीय रुग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
 
‘करोना कोविड १९’चा संसर्ग झालेल्या आणि उपनगरीय रुग्णालयातील प्रभावी वैद्यकीय सेवेनंतर बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक म्हणजे ३९ रुग्ण हे जोगेश्वरी परिसरात असणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयातील आहेत.‌ या खालोखाल घाटकोपर मधल्या राजावाडी परिसरातील ‘सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा रुग्णालयातून’ २७ रुग्ण; तर कुर्ला परिसरातील खान बहादुर भाभा रुग्णालयातून २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
 
वरील व्यतिरिक्त वांद्रे पश्चिम परिसरातील खुरशादजी बेहरामजी भाभा रुग्णालयातून ९ रुग्ण; तर कांदिवली पश्चिम परिसरातील ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून’ ३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यानुसार महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधून आजवर १०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशीही माहिती डॉक्टर प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
 
‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजारातून बरे होऊन घरी परतलेल्या या रुग्णांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातून दिवस-रात्र रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स, परिचारिका, कक्ष परिचर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.