गर्भपात औषधाच्या बेकायदा विक्री प्रकरणी ११ जणांना अटक, राज्यभरात १४ गुन्हे दाखल

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या औषधाची खरेदी विक्री करणारे विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवर २६ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत तपासणी तसेच धाड मोहीम राबवून एकूण ३४८ ठिकाणी तपासणी केली. या तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

    मुंबई : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने १४ गुन्हे दाखल केले असून ११ व्यक्तींना अटक केल्याची माहिती सहआयुक्त व औषध नियंत्रक प्राधिकारी दा. रा गहाणे यांनी मंगळवारी दिली.
    राज्यात गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली हाेती.

    अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या औषधाची खरेदी विक्री करणारे विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयांवर २६ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत तपासणी तसेच धाड मोहीम राबवून एकूण ३४८ ठिकाणी तपासणी केली. या तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

    त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले, चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ४७ हजार ३७८ रुपये किंमतीची औषधे जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याचे गहाणे यांनी सांगितले.

    अन्न व औषध प्रशासनाने केलेली कारवाई

    दरम्यान, एकूण १३ किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील पश्चिम उपनगरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध त्यानी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधाची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

    तसेच नाेंदविण्यात आलेल्या १४ गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत एकूण ११ व्यक्तींना अटक केली आहे. तर ज्या किरकाेळ व हाेलसेल औषध विक्रेत्यांच्या तपासण्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा ४२ विक्रेत्यांचे विरुध्द कारणे दाखवा नाेटीस बजावण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.