२६/११ च्या हल्ल्याला एक तप पूर्ण, मुंबईत शहीदांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम

२६/११ च्या हल्ल्याला एक तप पूर्ण होत आहे. यानिमित्त दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या नव्या स्मारकाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शहीदांचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज (गुरुवार) १२ वर्षं पूर्ण होतायत. यानिमित्त शहीदांना श्रद्धांजली देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत कऱण्यात आलंय. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित आमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

२६/११ च्या हल्ल्याला एक तप पूर्ण होत आहे. यानिमित्त दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या नव्या स्मारकाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शहीदांचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर वरीष्ठ अधिकारीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. या कार्यक्रमात दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शूरवीर पोलिसांना आणि सैनिकांना श्रद्दांजली वाहण्यात येणार आहे.

२६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्याबाबत भारतानं न्यायप्रक्रिया पूर्ण केलीय. मात्र १६६ शहीदांच्या कुटुंबीयांना अर्धा न्याय मिळाला, असेच म्हणावे लागेल. कारण पाकिस्तानकडून अद्याप याबाबत काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. यातील मुख्य आरोपींना पाकिस्ताननं ना अटक केली, ना त्यांच्यावर कुठला खटला चालवला. पाकिस्ताननं त्यांच्या देशात लपलेल्या दहशतवाद्यांना अटक करून न्याय करायला हवा. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर हाफिज सईद आणि जकीऊर रहमान लख्वी हे २६/११ च्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार अजूनही आरामात फिरत आहेत.

उज्ज्वल निकम, मुख्य सरकारी वकील

सध्या काही तांत्रिक कारणांमुळे शहीद स्मारक हे मरीन ड्राईव्हवरील पोलीस जिमखान्यातून क्रॉफर्ड मार्केटधील पोलीस मुख्यालयात तात्पुरतं स्थलांतरीत करण्यात आलंय.

२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला होता. सीएसटी, मरीन ड्राईव्ह आणि दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात १८ पोलिसांसह १६६ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यातील ९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. २१ नोव्हेंबर २०१२ या दिवशी कसाबला फासावर लटकवण्यात आलं.

या हल्ल्यात तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांना वीरमरण आलं होतं.