मुंबईत १४११ नवे रुग्ण  ; ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई :मुंबईत मंगळवारी १४११ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार ५६३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८०० वर पोहचला

मुंबई : मुंबईत मंगळवारी १४११ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार ५६३ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ८०० वर पोहचला आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून मंगळवारीही मुंबईमध्ये तब्बल १४११ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार ५६३ वर पोहचली आहे. १४ ते १६ मे दरम्यान केलेल्या ४२८ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. मुंबईमध्ये ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ८०० वर पोचली आहे.

यातील १५ जणांचा मृत्यू ६ ते १५ मेदरम्यान झाला आहे. मृत्यू झालेल्या ४३ जणांमधील ३२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २९ पुरुष तर १४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखालील, २० जण हे ६० वर्षांवरील, तर २१ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे ७२७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २० हजार ८११ वर पोहचली आहे. तसेच ६०० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ६११६ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून  देण्यात आली.