panvel corporation

    मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपाची विशेष सभा ऑनलाईन आयोजित केलेली असतानाही सभागृहात दाखल झालेल्या 15 नगरसेवकांवर महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

    यात शेकाप आणि महाविकास आघाडीच्या 14 तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. मालमत्ता कर आकारणीसाठी पनवेल महापालिकेची विशेष ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजपचे नगरसेवक मत मांडू देत नसल्याचा आरोप करत शेकाप आणि महाविकास आघाडीचे नगरसेवक थेट सभागृहात दाखल झाले आणि सभा सुरू करण्याची विनंती केली.

    यावेळी महापौरांनी या नगरसेवकांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र विरोधी नगरसेवक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. यानंतर सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी नगरसेवकांची समजूत काढत त्यांना सभागृहाबाहेर काढले.