मुंबईत १५ हजार फेरीवाल्यांना मिळणार हक्काची जागा, ९९ हजार फेरीवाल्यांचे जागेसाठी अर्ज

मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात १५ हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळणार आहे. पालिकेकडे अर्ज केलेल्या एकूण ९९ हजार अर्जांची छाननी केल्यानंतर तब्बल ८४ हजार अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेच्या धोरणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ४०४ रस्त्यांवर ३० हजार ८३२ जागा फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुंबई(mumbai) महानगरपालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात १५ हजार फेरीवाल्यांना हक्काची जागा(hawkers will get place) मिळणार आहे. पालिकेकडे अर्ज केलेल्या एकूण ९९ हजार अर्जांची छाननी केल्यानंतर तब्बल ८४ हजार अर्ज अपात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेच्या धोरणानुसार संपूर्ण मुंबईत एकूण ४०४ रस्त्यांवर ३० हजार ८३२ जागा फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.

मुंबईत धोरणानुसार पालिकेने पात्र फेरीवाल्यांना हक्काच्या जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पालिकेने केलेल्या आवाहनानुसार तब्बल ९९ हजार ४३५ जणांनी फेरीवाला जागेसाठी अर्ज सादर केले होते. या अर्जांच्या छाननीदरम्यान पालिकेने नागरिकांकडून हरकती-सूचना मागवल्या होत्या. यानुसार १७४५ हरकती-सूचना नोंदवल्या गेल्या. हरकती-सूचनांनुसार पालिकेने सर्व २४ वॉर्डमध्ये १२८४४३ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले. यातून सद्यस्थितीत पात्र ठरलेल्या १५ हजार ३६१ फेरीवाल्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. पालिकेच्या फेरीवाला धोरणाबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचना मांडून माहिती मागवली होती. यावर माहिती देताना पालिका आयुक्तांनी पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांबाबत अभिप्राय दिला आहे.

केंद्र सरकारच्या माध्यमातून १ मे २०१४ च्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम -2014 लागू करण्यात आला आहे. यानुसार मुंबईत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यीय समितीचे गठनही करण्यात आले होते. तसेच पालिकेच्या सात परिमंडळनिहाय नगर पथविक्रेता समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

प्राथमिक तत्त्वावर १३६६ रस्त्यांवर ८५८९१ जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. पालिकेच्या आवाहनानुसार यावर ४ डिसेंबर २०१८ ते १५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत १७४५ हरकती सूचना आल्या. यानुसार उपआयुक्त (विशेष)यांच्या सूचनेनुसार२२ विभाग कार्यालयांमध्ये नगरसेवकांशी चर्चा करून सहायक आयुक्तांच्या वतीने आवश्यक बदल करण्यात आले. यानुसार सद्यस्थितीत ४०४ रस्त्यांवर ३०८३२ पथविक्री जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र सद्यस्थितीत आलेल्या एकूण ९९ हजार ४३५ अर्जांपैकी १५ हजार ३६१ अर्जांना नगरपथविक्रेता समितीची मंजुरी प्राप्त झाली असून त्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे़.

केंद्र सरकारने फेरीवाला धोरण तयार केले असून देशभरात हे धोरण लागू होणार आहे. मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करताना नगरसेवकांना विश्वासात घेतले नसून नगरसेवक हे स्थानिक पातळीवर काम करतात. त्यामुळे नगरसेवकांना विश्वासात घेत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, अशी सूचना शिवसेना सभागृह नेते विशाखा राऊत आणि विरोधी पक्षनेते रविराजा यांनी केली होती. पण पालिका प्रशासनाने सूचनेला बगल देत नगरपथ विक्रेता समितीतूनही नगरसेवकांना आऊट केले आहे.