मुंबईत १५६६ नवे रुग्ण  ; ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई:मुंबईत शनिवारी १५६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ६३४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९४९ वर पोहचला

मुंबई: मुंबईत शनिवारी १५६६ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ६३४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ९४९ वर पोहचला आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून शनिवारी मुंबईमध्ये तब्बल १५६६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ६३४ वर पोहचली आहे.१९ ते २१ मे पर्यंत झालेल्या २९२ चाचण्यांचा पॉझिटिव्ह अहवाल शनिवारी आल्याने त्यांचाही यात समावेश आहे.

मुंबईमध्ये ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ९४९ वर पोचली आहे.मृत्यू झालेल्या ४० जणांमधील २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २५ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील चौघांचे वय ४० वर्षांखालील, २१ जण हे ६० वर्षांवरील, तर १५ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाचे १०५९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या २४ हजार ३२३ वर पोहचली आहे. तसेच ३९६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ७४७६ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.