लॉकडाऊनमुळे २०५ विद्यार्थ्यांची रखडली परीक्षा

३३६४ विद्यार्थ्यांपैकी ३१५९ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर मुंबई:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान

३३६४ विद्यार्थ्यांपैकी ३१५९ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर

मुंबई:  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरामेडिकल कर्मचार्‍यांची भासणारी उणीव भरून काढण्यासाठी नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून (एमयूएचएस) मॉर्डन मिडलेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्सचा (एमएमएसपीसी) निकाल तातडीने लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन असतानाही आतापर्यंत ३३६४ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३१५९ विद्यार्थ्यांचे निकाल टप्प्याटप्प्याने लावले. परंतु तरीही २०५ विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला. कोरोनामुळे त्यांची परीक्षाच रखडल्याने त्यांचा निकाल लावणे आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही शक्य झाले नाही. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागातही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारने एमएमएसपीसी परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मार्चमध्ये घेतलेल्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेचा निकाल तातडीने लावण्याचे आदेश राज्य सरकारने विद्यापीठाला दिले.

उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी राज्यातून तब्बल ३३६४ विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. यामध्ये आयुर्वेदाची पदवी घेतलेले २२९५ तर नर्सिंगची पदवी घेतलेले १०६९ विद्यार्थी होते. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे साहित्य तातडीने विद्यापीठाकडे पाठवण्याचे आदेश वैद्यकीय कॉलेजांना देण्यात आले होते. लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने पोहचलेल्या उत्तरपत्रिका तपासून विद्यापीठानेही एकत्रित निकाल जाहीर न करता टप्याटप्प्याने निकाल जाहीर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत एप्रिलमध्ये २८७३ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला. मात्र प्रात्याक्षिक परीक्षा न झाल्याने ४९१ विद्यार्थ्यांचा निकाल रखडला होता. परंतु वैद्यकीय कॉलेजांनी लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये शक्य होईल त्या पद्धतीने सुरक्षेचे नियम पाळत उर्वरित विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक परीक्षा घेतल्याने जूनमध्ये २८६ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करता आला. परंतु रेड झोन असलेल्या भागातील वैद्यकीय कॉलेजांना प्रात्याक्षिक परीक्षा घेणे शक्य न झाल्याने तब्बल २०५ विद्यार्थ्यांची परीक्षा रखडली आहे. या विद्यार्थ्यांची प्रात्याक्षिक परीक्षा व्हावी यासाठी विद्यापीठ व कॉलेजांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु रेड झोन व कंटेन्मेट झोनमुळे त्यांना अपयश येत आहे. परिणामी ग्रामीण भागामध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी विद्यापीठाचा प्रयत्नांना खीळ बसली आहे. 

"एमएमएसपीसीच्या परीक्षेला ३३६४ विद्यार्थी बसले होते. सरकारची गरज लक्षात घेत विद्यापीठ आणि कॉलेजांनी परीक्षा घेतल्याने ३०६९ विद्यार्थी कोविड सेवेसाठी उपलब्ध झाले. केंद्रावरील डॉक्टरही रुग्णसेवेत व्यस्त असल्याने प्रात्याक्षिक परीक्षा घेणे शक्य झाले नाही. मात्र जूनमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे."

– डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ