मंत्र्यांनी घेतला २४ लाख ५६ हजार रुपयांच्या पाण्याचा घोट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेच्या डिफॉल्टर लिस्टमध्ये

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह अनेक मंत्र्यांची शासकीय निवासस्थानाची पाणीपट्टी थकली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची २४ लाख ५६ हजार ४६९ इतकी पाणीपट्टी थकित आहे.

माहितीच्या अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ही केलेल्या माहिती अधिकाऱ्याच्या अर्जानंतर ही बाब उघडकीस आली आहे.

माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला, अर्थमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, राजेश टोपे यांचा जेतवन आदी बंगल्यांची पाणीपट्टी थकली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याचाही समावेश आहे.

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे.  पाणीपट्टी थकल्यास महापालिकेकडून सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते. तर, आता अशीच कारवाई मंत्र्यांवर देखील होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.