25th Organ Donation in Mumbai Dadasaheb 56 got a new heart
मुंबईतील २५ वे अवयवदान; ५६ वर्षीय दादासाहेब यांना मिळाले नवीन हृदय

महाराष्ट्रातील सांगली येथे राहणारे ५६ वर्षांचे दादासाहेब पाटील यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. हे मुंबईतील २५ वे अवयवदान होते एका ३१ वर्षीय तरुणाच्या मृतदेहातून हे हृदय काढण्यात आले आणि प्रत्यारोपणाकरीता खास तयार केलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ द्वारे अपोलो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

  • परळ ते बेलापूर पर्यंत ‘ग्रीन कॉरिडोर’ द्वारे फक्त २५ मिनिटांत पार केले ४५ किमी अंतर

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातील (Maharashtra) सांगली (Sangali) येथे राहणारे ५६ वर्षांचे दादासाहेब पाटील (dadasaheb patil) यांच्यावर नवी मुंबईतील (navi mumbai) अपोलो हॉस्पिटलमध्ये (apollo hospital) हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. हे मुंबईतील २५ वे अवयवदान (organ donation) होते एका ३१ वर्षीय तरुणाच्या मृतदेहातून हे हृदय काढण्यात आले आणि प्रत्यारोपणाकरीता खास तयार केलेल्या ‘ग्रीन कॉरिडॉर’ (green coridor) द्वारे अपोलो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. लोअर परळ मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल ते नवी मुंबईतील-अपोलो हॉस्पिटल हे ४५ किलोमीटरचे अंतर पार पाडण्यात हॉस्पिटलच्या पथकाला अवघा २५ मिनिटांचा कालावधी लागला.

हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखालील अपोलोच्या विशेष तज्ज्ञांच्या पथकाने ‘अपोलो हॉस्पिटल’ मध्ये दादासाहेब यांच्यावर या हृदयाचे प्रत्यारोपण यशस्वीपणे केले. हा रुग्ण ‘इस्केमिक डायलेटेड कार्डिओमायोपॅथी’ ने ग्रस्त होता, त्याच्या हृदयाची रक्ताभिसरणाची क्षमता कमी होती आणि त्यामुळे त्याची हृदयक्रिया बंद पडण्याच्या बेतात होती. हृदय प्रत्यारोपण हाच या रुग्णाच्या आयुष्य वाचवण्याचा एकमेव मार्ग होता.

डॉ.संजीव जाधव हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणाचे सर्जन, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई म्हणाले, “हा रुग्ण आठ महिन्यांपूर्वी आमच्याकडे बायपास शस्त्रक्रियेसाठी आला. तपासणीदरम्यान असे आढळून आले की त्याच्या हृदयाचे कार्य केवळ २५ टक्के इतकेच सुरू होते. त्या काळात कोविड परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया होऊ शकली नाही आणि त्याला परत आपल्या गावी सांगली येथे जावे लागले. पुढच्या काही महिन्यांत, त्याच्या हृदयाचे कार्य कमी होत गेले. संपूर्ण ‘लाइफ सपोर्ट सिस्टीम’ आणि हृदयाच्या आकुंचनाची शक्ती वाढवणाऱी औषधे (इनोट्रॉप) यांची आवश्यकता असण्याच्या स्थितीत तो शेवटी आला. ‘हार्ट फेल्युअर’च्या घटना त्याच्या बाबतीत वारंवार होऊ लागल्या आणि प्रत्यारोपणाच्या आधी त्याला इतर काही रुग्णालयांमध्ये दाखलही करण्यात आले. ही काळाच्या विरूद्धची शर्यत होती आम्हाला मुंबईतील रक्तदात्याबद्दल माहिती मिळाली, त्या वेळी ग्रीन कॉरिडॉर तातडीने कार्यान्वित करण्यात आला.

दात्याचे हृदय काढून घेण्यात आले, ते ‘अपोलो हॉस्पिटल’ मध्ये आणण्यात आले व त्याचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. हे एक वैज्ञानिक आव्हानदेखील होते. डॉक्टर आणि परिचारिका हे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करीत आहेत आणि रूग्णांचे आयुष्य वाचविण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. आम्हाला आनंद वाटतो की ही ह्रदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया समाधानकारक झाली व रुग्ण बरा झाला.’’

अवयवदात्याकडून हृदय प्राप्त झालेले दादासाहेब पाटील म्हणाले, “पुण्यातील एका संभाव्य दात्याकडून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळवण्याची संधी मी नुकतीच गमावली होती. हृदय निकामी झाल्याचे अनेक भोग मी भोगले असल्यामुळे माझ्यासाठी, ही काळाच्या विरोधातील लढाईच होती. नशीबाने आम्हाला एक हृदयदाता आढळला. प्रत्यारोपणाची संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुरळीत पार पाडल्याबद्दल अपोलो हॉस्पिटलच्या पथकाचा मी आभारी आहे. मला आयुष्याची दुसरी संधी दिल्याबद्दल मी दात्याच्या कुटुंबाचा आणि डॉक्टरांचा ऋणी आहे.”

कार्डिओ थोरॅसिक व व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. शांतेश कौशिक, सीव्हीटीएस सर्जन डॉ. सचिन सणगर, सीव्हीटीएस डॉ. कमल सिंग, इन्टेन्व्हिस्ट डॉ. गुणाधर पधी, इन्टेन्व्हिस्ट डॉ. हरिदास मुंडे आणि इन्टेन्व्हिस्ट डॉ. सौरभ तिवारी या तज्ज्ञांच्या पथकाची डॉ. संजीव यांना साथ लाभली. हृदय प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया ९० मिनिटे चालली. त्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात निरक्षणासाठी ठेवण्यात आले.