मुंबईत आज कोरोनामुळे २७ जणांचा मृत्यू

मुंबई :मुंबईमध्ये काल आतापर्यंतचे सर्वाधिक ७५१ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर आज तब्बल २७ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच मृतांच्या संख्येत वाढ होणे ही बाब

 मुंबई : मुंबईमध्ये काल आतापर्यंतचे सर्वाधिक ७५१ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर आज तब्बल २७ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. रुग्णसंख्या वाढण्याबरोबरच मृतांच्या संख्येत वाढ होणे ही बाब मुंबईसाठी धोकादायक आहे. मुंबईत शनिवारी तब्बल ५४७ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ८१७२ वर पोहचला आहे. यामधील १९० रुग्णांच्या चाचण्या २९ ते ३० एप्रिलदरम्यान केल्या होत्या. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. त्याचवेळी शनिवारी तब्बल २७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील मृतांची संख्या ३३२ इतकी झाली आहे. मृतांमध्ये २० रुग्ण हे दीर्घकाळ आजारी होते. यामध्ये २० पुरुष तर ७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १२ जण हे ६० वर्षांवरील तर १५ जण हे ४० ते ६० च्या दरम्यान आहेत. 

मुंबईत कोरोनाचे ४८१ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ९९५ वर पोहचली आहे. तसेच १३७ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १७०४ जणांना घरी सोडण्यात आले असून यातील १४५ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली आहे.