मुंबईतील ३४४ धोकादायक पूल बळकट आणि मजबूत होणार; BMC ने घेतला मोठा निर्णय

मुंबईतील बहुतांश पूल ब्रिटीशकालीन असून यातील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत. या पुलांच्या पडझडीचा धोका टाळण्यासाठी पुलांचे नियमित ऑडिट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सल्लागाराच्या सल्ल्यानुसार पुलाची डागडुजी अथवा पूल पाडून त्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे.

    मुंबई : मुंबईतील ब्रिटीशकालीन असलेल्या ३४४ धोकादायक पुलांचा धोका टाळण्यासाठी या पुलांचे नियमित ऑडिट केले जाणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार येणार असल्याची माहिती पूल विभागातील अधिका-यानी दिली.

    मुंबईतील बहुतांश पूल ब्रिटीशकालीन असून यातील अनेक पूल धोकादायक स्थितीत आहेत. या पुलांच्या पडझडीचा धोका टाळण्यासाठी पुलांचे नियमित ऑडिट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. सल्लागाराच्या सल्ल्यानुसार पुलाची डागडुजी अथवा पूल पाडून त्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे.

    अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू तर सीएसएमटी येथील हिमालय पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३१ पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पुलांचे ऑडिट करण्यात आले. पूर्वी पुलांचे ठराविक वर्षांनी ऑडीट केले जात होते. मार्च २०१९ मध्ये सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पादचारी पूल कोसळण्यापूर्वी ऑडीट करण्यात आले होते. या ऑडिट मध्ये हिमालय पादचारी पुलाच्या दुरुस्तीची शिफारस करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पूल कोसळल्याने पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा ऑडीट करण्याचे निर्णय घेतला. त्या ऑडिटच्या शिफारशी नंतर पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.

    ठराविक काळाने होणाऱ्या ऑडिटच्या पुढे जाऊन आता नियमीत केले जाणार आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्तीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. हा सल्लागार नियमित पुलांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून पालिकेला पुलांची डागडूजी, दुरुस्तीबाबत मार्गदर्शन करेल. पाच वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सल्लागाराच्या सुचनेनुसार कंत्राटदार नियुक्त करुन कामे करुन घेतली जाते. या सल्लागारासाठी अंदाजित शुल्क ४ कोटी रुपये ठरविण्यात आले आहे.

    अर्थंसल्पात पुलांची डागडूजी, दुरुस्ती, पुनर्बांधणी तसेच नवे पुल बांधण्यासाठी ९६१ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ३४४ पुलांपैकी २१ पुलांचे पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच ४७ पुलांची मोठी दुरुस्ती आणि १४४ पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.