मुंबई विभागीय मंडळाची उल्लेखनीय कामगिरी – ४२ लाख उत्तरपत्रिका तपासल्या

मुंबई :लॉकडाऊनमुळे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी उत्तरपत्रिका शाळांमध्येच अडकल्याने तपासनिसांकडून मॉडरेटरपर्यंत पोहचविण्यापर्यंत मंडळाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.या सर्व

मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी उत्तरपत्रिका शाळांमध्येच अडकल्याने तपासनिसांकडून मॉडरेटरपर्यंत पोहचविण्यापर्यंत मंडळाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.या सर्व बाबींवर मात करत राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाच्या निकालाचे काम वेगात सुरु असून आतापर्यंत ८५ टक्के म्हणजे ४२ लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पूर्ण झाले असल्याचे समजते. मुंबई विभागीय मंडळाकडे ५० लाखांहून अधिक उत्तरपत्रिका आहेत. या उत्तरपत्रिकाही लवकरच तपासण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली. त्यामुळे पालकांनी निश्चिंत राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळापैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि मॉडरेटरचे मोठे आव्हान मुंबई विभागासमोर होते. राज्य सरकारच्या आणि पोस्टाच्या सहकार्याने मुंबई विभागाने जवळपास सर्वच उत्तरपत्रिका तपासनिकांपर्यंत पोहचवल्या. यासाठी मुंबई विभागाने आपल्या कामांची सुरुवात पालघर जिल्ह्यांपासून  करत नंतर रायगड, ठाणे शहर, ठाणे जिल्हा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराकडे कूच केली.यासाठी मुंबईत आणि मुंबई बाहेर अडकलेल्या तपासनिकांनापर्यंत उत्तरपत्रिका पोचविण्यासाठी त्यांच्या आपत्कालीन पासची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व व्यवस्था मुंबई विभागीय मंडळाने राज्य सरकार, शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण केली.यासाठी मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरच्या संख्येतही वाढ केली. ज्याचा फायदा झाल्याची माहिती मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली. 

आतापर्यंत दहावीच्या आणि बारावीच्या ८५ टक्के उत्तरपत्रिकांच्या सबमिशनचे काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सबमिशनच्या कामासाठी बोर्डाने तयारी केली असून येत्या १५ आणि १६ जूनला मुंबईत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ उपलब्ध करण्यापासून ते खबरदारीच्या सर्व उपाय योजना राबविण्याचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर होते. मात्र राज्य मंडळाच्या मदतीने आणि मुंबई विभागाच्या कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे हे काम आम्ही करु शकलो आहे. आता मुंबईचे आव्हान लवकरच पूर्ण करायचे असून यासाठी मुंबईत येत्या १५ आणि १६ जूनला उत्तरपत्रिका जमा करण्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत. ज्याला तपासनिक आणि मॉडरेटने उत्तम प्रतिसाद देण्याचे आवाहन संगवे यांनी यावेळी केले आहे. 

मुंबई विभागीयनिहाय जमा झालेल्या उत्तरपत्रिका- ठाणे ९५ टक्के, पालघर ९५ टक्के, रायगड ९३ टक्के, मुंबई ४५ टक्के

मुंबई विभागातून परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी संख्या- दहावी ३,९१,९९१ ,बारावी ३,३९,०१४