महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतून ६ मृतदेह बेपत्ता नाही, महानगरपालिकेचा वस्तुस्थितीदर्शक खुलासा

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतून आतापर्यंत ६ मृतदेह गायब झाल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून करण्यात येत आहेत. तथापि, हे मृतदेह बेपत्ता झालेले नाहीत. केईएम, नायर, सायन,

 मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतून आतापर्यंत ६ मृतदेह गायब झाल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून करण्यात येत आहेत. तथापि, हे मृतदेह बेपत्ता झालेले नाहीत. 

केईएम, नायर, सायन, जोगेश्वरी ट्रॉमा, कांदिवली शताब्दी या रुग्णालयांच्या संदर्भातील मृतदेहांच्या प्रकरणांचा उलगडा झाला असून त्यांची वस्तुस्थिती प्रशासनाने वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मुख्यत: नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने किंवा नातेवाईकांशी उशिरा संपर्क झाल्याने या घटना घडल्या असल्या तरी त्यांचे प्रशासनाने कधीही समर्थन केलेले नाही. ६ पैकी ५ प्रकरणांत मृतदेहांची ओळख पटली, नातेवाईकांना अवगत करण्यात आले अथवा कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलीस प्रशासनासमवेत उचित कार्यवाही करण्यात आली आहे. 

राजावाडी रुग्णालयातील मृतदेह प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून त्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारा खुलासा स्वतंत्रपणे पाठवण्यात येत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ नये, तसेच आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, हीच महानगरपालिका प्रशासनाची पुनश्च विनंती आहे.