साडेसात लाख मुंबईकर कंटेनमेंटझोनमध्ये;  दहा दिवसांत ८८२ मजले सील!

इमारतीत पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाते आहे. तर २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तो मजला किंवा इमारतीचा भाग सील केला जातो आहे. सद्यस्थितीत चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेमेंट झोनमध्ये ४२ हजार घरांमधील १ लाख ७९ हजार रहिवासी कंटेनमेंटझोनमध्ये आहेत.

    मुंबई : मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून यात चाळी आणि झोपडट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये ९० टक्क्यांहून जास्त रुग्णसंख्या आढळली आहे. त्यामुळे पालिकेने इमारतींवर अधिक लक्ष वेधले असून येथे नियमांची कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. गेल्या १० दिवसांत ७९९ मजले, ८३ इमारती आणि १६ कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे. तर सद्यस्थितीत मुंबईत २२८ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सील मजले-भागांची संख्या २८१५ झाली असून चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोनची संख्या २७ वर पोहोचली आहे.

    मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर सुरुवातीला दाटीवाटीच्या चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले होते. यामध्ये आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाचा संसर्ग झपाटयाने पसरला होता. तसेच कुर्ला, वरळी कोळीवाडा, मानखुर्द, गोवंडीसारख्या भागात कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने ही ठिकाणे ‘कोरोना हॉटस्पॉट’ जाहीर करण्यात आली. दाटीवाटीचा भाग असल्याने येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेसमोर आव्हान उभे राहिले होते. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र यांमध्ये चाळी-झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

    साडेसात लाख मुंबईकर कंटेनमेंटझोनमध्ये

    इमारतीत पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाते आहे. तर २ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास तो मजला किंवा इमारतीचा भाग सील केला जातो आहे. सद्यस्थितीत चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेमेंट झोनमध्ये ४२ हजार घरांमधील १ लाख ७९ हजार रहिवासी कंटेनमेंटझोनमध्ये आहेत. तर इमारतींमधील ३७ हजार घरांमधील १ लाख ३६ हजार रहिवासी प्रतिबंधात (कंटेनमेंट झोन) आहेत. तर २८१५ मजले सील असल्याने तब्बल १ लाख ११ हजार घरांमधील ४ लाख ३५ हजार रहिवासी प्रतिबंधात आहेत. तिन्ही प्रकारात एकूण १ लाख ९० हजार घरांतील तब्बल ७ लाख ५० हजार मुंबईकर सध्या प्रतिबंधात आहेत.