शाळा सुरू करण्याला ८१ टक्के पालकांची संमती; सर्वेक्षणाचा अहवाल

कोविड मुक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली. त्यानंतर पालकांच्या मागणीनुसार शिक्षण विभागाने अन्य वर्गांच्या शाळा सुरू करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात नववी, दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वाधिक सहभाग नोेंदवला. त्याखालोखाल सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच पहिल्या दिवसाच्या तुलनेत संपूर्ण सर्वेक्षणात शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा अधिक समावेश असल्याचे सर्व्हेक्षणात समाेर आले आहे.

  मुंबई : कोविड मुक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली. त्यानंतर पालकांच्या मागणीनुसार शिक्षण विभागाने अन्य वर्गांच्या शाळा सुरू करण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात नववी, दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वाधिक सहभाग नोेंदवला. त्याखालोखाल सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच पहिल्या दिवसाच्या तुलनेत संपूर्ण सर्वेक्षणात शहरी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा अधिक समावेश असल्याचे सर्व्हेक्षणात समाेर आले आहे.

  राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोविड मुक्त ग्रामीण भागात ग्राम पंचायत समिती आणि स्थानिक प्रशासनाला आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली. या पार्श्वभूमीवर अन्य वर्गही सुरू करण्यासंदर्भात पालकांकडून होत असलेल्या मागणीमुळे पालकांचे मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालकांची मते जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ९ ते १२ जुलैपर्यंत http://www.maa.ac.in/survey ही लिंक उपलब्ध करून दिली.

  चार दिवसात लिंकवर ६ लाख ९० हजार ८२० पालकांची मते

  चार दिवसांमध्ये या लिंकवर राज्यातील तब्बल ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी आपले मते मांडली. यामध्ये कोविड संबंधित आवश्यक त्या सर्व सुरक्षाविषयक उपाययोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास ८१.१८ टक्के पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठवण्याची तयारी दर्शवली. तर  १८.८२ टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास नकार दर्शवला. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६ लाख ९० हजार ८२० पालकांमध्ये नववी, दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांची संख्या सर्वाधिक म्हणजे २ लाख ८६ हजार ९९० इतकी होती. हे प्रमाण एकूण पालकांच्या तुलनेत ४१.५४ टक्के इतके आहे. त्याखालोखाल सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांचे २ लाख १५ हजार ५९० (३१.२१ टक्के) पालक तर पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांचे १ लाख ६२ हजार १८४ (२३.४८ टक्के) पालक आणि अकरावी,बारावीतील विद्यार्थ्यांचे १ लाख ५ हजार ३९२ (१५.२६ टक्के) पालक सहभागी झाले होते. नर्सरीमधील विद्यार्थ्यांचे पालक सर्वाधिक कमी प्रमाणात म्हणजेच १९ हजार २७३ (२.७९ टक्के) पालक या सर्वेक्षणात सहभागी झाले होते.

  काेणत्या जिल्ह्यातील पालकांनी सहभाग नाेंदवला

  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात मुंबईतून सर्वाधिक १,१०,१९३ पालक सहभागी झाले होते. त्याखालोखल पुणे ७३८३८, नाशिक ४७२०२, सातारा ४१२३३, ठाणे ३९२२१, कोल्हापूर ३०४३७, पालघर २३३३९ या जिल्ह्यातील पालक सहभागी झाले होते. तर सर्वाधिक कमी सहभाग हा गडचिरोली ३१३१, नंदुरबार ४४८४ आणि वाशिम ५३७२ या जिल्ह्यातील पालकांनी नोंदवला.

  शहरी शाळांमधील पालकांचा सर्वाधिक समावेश

  शाळा सुरू करण्यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात शहरी भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांचे पालक सर्वाधिक सहभागी झाले आहेत. शहरी भागातील शाळांमधील पाल्यांच्या ३ लाख ६३ हजार ६४२ पालकांनी (५२.६४ टक्के) सहभाग नोंदवला आहे. त्याखालोखाल ग्रामीण भागातील पाल्यांच्या २ लाख ४० हजार ७७९ पालकांनी (३४.८५ टक्के) तर निमशहरी भागातील ८६ हजार ३९९ पालकांनी (१२.५१ टक्के) पालकांनी सहभाग नोंदवला आहे.