कंगना रणौतच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवणाऱ्या BMC ची पोलखोल; RTI मध्ये धक्कादायक माहिती उघड

  मुंबई : लॉकडाऊनदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुलडोझर फिरवणाऱ्या पालिकेला मुंबईत गेल्या ११ महिन्यांपासून होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पूर्णत: कारवाई करण्यात अपयश आले आहे. ११ महिन्यांत मुंबईत सुमारे ९५५८ अनधिकृत बांधकामे झाली असून त्यापैकी केवळ ४६६ अवैध बांधकामे तोडण्यात पालिकेला यश आले.

  अनधिकृत बांधकामात एल वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या कुर्ला, साकीनाका परिसरत आघाडीवर राहिले. येथे सुमारे २००२ अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ही बाब माहिती अधिकारातून समजली आहे.

  मुंबईत लॉकडाऊनदरम्यान लोकं आपल्या घरात बंद होती, उद्योग, व्यवसाय ठप्प होता. असे असताना अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना मजूर, बांधकाम साहित्या कोठून मिळाले? हा प्रश्न आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात पालिका कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

  आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांिगतले की, मुंबई पालिकेकडे लॉकडाऊनदरम्यान अनधिकृत बांधकामांची माहिती मागवली होती. भू-माफियांनी २५ मार्च २०२० पासून २५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबईत ९५५८ अनधिकृत बांधकामे झालीत. शेख यांनी सांिगतले की, कोरोना महामारीदरम्यान अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची लॉटरी लागली होती.

  कोरोना महामारी आणि पालिकेच्या हलगर्जीपणाचा फायदा उचलत मुंबईत मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे झाली. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत एकूण १३,३२५ ऑनलाईन तक्रारी मिळाल्या. तर ९५५८ अनधिकृत बांधकामे करण्यात आली. यादरम्यान केवळ ४६६ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्या. मुंबईत सर्वाधिक ३२५१ तक्रारी एल वॉर्डमध्ये नोंदवण्यात आल्या.

  कारवाईच्या नावे देखावा

  पालिका कारवाईच्या नावावर केवळ देखावा करत आहे. कोरोनाच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाईची कार्यतत्परता पालिकेने दाखवली, ती मुंबईतील इतर बांधकामांसंदर्भात केव्हा दाखवणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पालिकेला दरवर्षी अनधिकृत बांधकामांवर होणाऱ्या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त आणि इतर संसाधनांवर सुमारे २० कोटींचा खर्च येतो. परंतु, तोडक कारवाई केवळ नावालाच होते. तसेच पालिका दरवर्षी सुमारे १५ हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामांना नोटीसा धाडते, असेही त्यांनी म्हटले आहे.