आजपासून अनंत चतुर्दर्शीपर्यंत मुंबईत जमावबंदीला सुरुवात

१० सप्टेंबर गणेश चतुर्थी ते १९ सप्टेंबर अनंत चतुर्दर्शीपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमता येणार नाही.

  मुंबई: आज पासून सुरु होत असलेला गणेशोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. कोरोनाच्या सावटामुळे गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठी सर्तकता बाळगली जात आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू (curfew)करण्यात आली आहे. १० सप्टेंबर गणेश चतुर्थी ते १९ सप्टेंबर अनंत चतुर्दर्शीपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमता येणार नाही. रस्त्यांवरच नव्हे तर इमारतींच्या आतील परिसरातही हा नियम कटाक्षाने पाळावा लागणार आहे अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व कोरोनाची रुग्णसंख्या वाढू नये यासाठी नियमांचे पालन करून लक्षात घेत गणेशोत्सवदेखील साजरा करावा. गणेशोत्सव मंडळांनी गर्दी टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी.

  पोलीस आयुक्त हेमंत नगराळे
  या गोष्टींचे करा पालन

  – गणेश मंडपाच्या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करू नये.
  – ऑनलाइन दर्शन घ्यावे. प्रत्यक्ष दर्शन अथवा मुखदर्शन घेण्याचा मोह टाळावा.
  –  पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये.
  – संशयास्पद गोष्ट दिसल्यास त्वरित तैनात असलेल्या पोलिसांना अथवा 100 क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी.
  – लहान बालके व वृद्धांना गणेश मंडपाजवळ घेऊन जाऊ नये.
  – कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावावा.

  असे आहेत नियम

  • भाविकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्या.
  • ऑनलाइन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
  • आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नका.
  • मुखदर्शनाची मुभा देऊ नये. सांस्कृतिक कार्यक्रम करू नये.
  • सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काळजी घ्या.
  • गणेशमूर्तीच्या पूजेकरिता ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत असे पाच तर विसर्जनाकरिता दहा जणांना सहभागी करून घ्यावे.