परमबीर सिंह यांच्याविरोधात नव्याने याचिका , पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता

२०१८ मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरूनच आपल्याकडे खंडणी मागितली असल्याचा आरोपही अर्जातून भट यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा आणि पराग मणेरे यांच्यासमवेत अनेक व्यावसायिकांकडून अशाच प्रकारे खंडणी गोळा केली आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात नव्याने हस्तक्षेप याचिका दाखल कऱण्यात आला आहे. मुंबईतील एका विकासकाने दाखल केलेल्या अर्जामध्ये परमबीर यांनी त्यांच्या (विकासकाच्या) विरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ नये, यासाठी २०० कोटींची मागणी केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

    अर्जदार कार्तिक भट याने विकासक दिपक निकाळजेसोबत चेंबूर येथील एका झोपडपट्टी पुनर्वसन गृहनिर्माण प्रकल्प सुरू केल्याचे सांगत साडे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष मिठबावकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात भट विरोधात २०२० मध्ये एफआयआर दाखल केली होती.

    एफआयआरप्रमाणे तपास न करण्यासाठी म्हणून चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून आपल्याकडे २०० कोटी रुपयांची मागणी केली. तसेच सदर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ४२५ कोटींच्या उत्पन्नातील १० टक्क्यांची मागणी केली असल्याचा आरोप सदर अर्जातून करण्यात आला आहे.

    २०१८ मध्ये याच गृहनिर्माण प्रकल्पासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे यांनी परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरूनच आपल्याकडे खंडणी मागितली असल्याचा आरोपही अर्जातून भट यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा आणि पराग मणेरे यांच्यासमवेत अनेक व्यावसायिकांकडून अशाच प्रकारे खंडणी गोळा केली आहे.

    तसेच, अशाच प्रकारे तपासात प्रभाव टाकून त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही भट यांनी हस्तक्षेप अर्जातून केला आहे.सदर अर्जावर न्या. एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गुरुवारी वेळेअभावी सुनावणी पार पडू न शकल्यामुळे १४ जून रोजी ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.