शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि मंत्र्याची बैठक

बैठकीत शिवसेना मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर पडलेल्या धाडी तसेच अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांच्या कुटूंबियावर होत असलेल्या सक्त वसुली संचलनालयाच्या कारवाईबाबत चर्चा केल्या जाण्याची शक्यता आहे.

  मुंबई (Mumbai) : राज्यातील महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) पहिल्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या मंत्री (Shiv Sena ministers) आणि लोकप्रतिनीधीं (people’s representatives) भोवती केंद्रीय तपास यंत्रणांचा (the Central Investigation Agency) फास आवळला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  या सा-या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते आणि मंत्र्याशी सल्ला मसलत करण्यासाठी उद्या (३१ऑगस्ट) रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे.

  बैठक पूर्वनियोजित
  या बैठकीत शिवसेना मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधीत ठिकाणांवर पडलेल्या धाडी तसेच अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांच्या कुटूंबियावर होत असलेल्या सक्त वसुली संचलनालयाच्या कारवाईबाबत चर्चा केल्या जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या सूत्रांच्या मते मात्र ही बैठक पूर्वनियोजीत असून दर दोन महिन्यानी पवार यांच्याकडून सर्व मंत्र्याच्या कामाचा आढावा घेतला जातो. त्यानुसार ही बैठक होणार आहे. त्याला सध्याच्या वेगवान राजकीय घडामोडींची पार्श्वभुमी असल्याने त्यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे मात्र ही बैठक अचानकपणे आयोजित करण्यात आलेली नाही असे या नेत्याने सांगितले.

  मंत्र्याच्या खात्यांची झाडा-झडती
  या बैठकीला पक्षाचे खासदार, प्रमुख आमदार पक्ष पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नेत्यांसह सर्व १६ मंत्री राज्यमंत्री हजर राहणार आहेत. त्यात राज्या समोरच्या पाऊस पाण्याची स्थिती, शेती, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सरकार समोरच्या आव्हांनांवर शरद पवार यांच्याकडून मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वलसे पाटिल, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडेसह महत्वाच्या खात्याच्या मंत्र्याच्या खात्यांची झाडा झडती केली जाण्याची शक्यता आहे.