क्लर्कची श्रीमंती आणि लाईफस्टाईल पाहून नातेवाईकाचा जळफळाट; मुंबईत उघड झाला 21 कोटींचा ईपीएफओ घोटाळा

एका क्लर्कची श्रीमंती पाहून त्याच्याच नातेवाईकाच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली आणि त्याने थेट निनावी पत्राद्वारे या घोटाळ्याची तक्रार केली होती. चंदन कुमार सिन्हा असे या आरोपीचे नाव असून, तो पीएफ कार्यालयामध्ये लिपीक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे.

  मुंबई : कोरोना काळात नागरिकांना मदत मिळावी, यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ‘इपीएफओ’च्या नियमांमध्ये सरकारकडून शिथिलता देण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेत, मुंबईतील कांदिवलीच्या पीएफ कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे अंतर्गत लेखापरीक्षणात उघड झाले आहे.

  एका क्लर्कची श्रीमंती पाहून त्याच्याच नातेवाईकाच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली आणि त्याने थेट निनावी पत्राद्वारे या घोटाळ्याची तक्रार केली होती. चंदन कुमार सिन्हा असे या आरोपीचे नाव असून, तो पीएफ कार्यालयामध्ये लिपीक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे.

  ‘लाईफस्टाईल’ चा हेवा

  ईपीएफओ कार्यालयाला एक निनावी तक्रार प्राप्त झाली होती. ही तक्रार सिन्हाच्या एका नातेवाईकाने केली होती. हा नातेवाईक सिन्हाच्या ‘लाईफस्टाईल’वरून ईर्ष्याग्रस्त झाला होता व त्याबाबत त्याला त्याचा हेवाही वाटत होता. घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सिन्हाचा साथीदार अभिजित ओंकरही आहे, जो त्याच्याचप्रमाणे क्लर्क होता आणि बँक अकाऊंट मॅनेज करण्यास त्याने मदत केली होती.

  817 बँक खात्यांचा वापर

  सिन्हाने 817 स्थलांतरित कामगारांच्या बँक खात्याचा वापर करून, पीएफच्या रकमेवर दावा केला. व त्यानंतर संबंधित पीएफ खात्यातील 21.5 कोटी रुपयांची रक्कम आपल्या खात्यावर वळवली. यामधील 90 टक्के रक्कम ही बँकेमधून काढून घेण्यात आल्याचे देखील तपासात उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी चार ते पाच कर्मचारी सहभागी असून, त्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे.

  सिस्टीममधील त्रुटींमुळे घोटाळा

  पीएफ कार्यालयामधील अनेक अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनदरम्यान वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रणालीसाठीचे आपले पासवर्ड सिन्हा याला दिले होते. त्यानंतर त्यांनी आपले पासवर्ड बदलले नाहीत, याचाच फायदा आरोपीने घेतला. तसेच सिस्टीममधील काही त्रुटींचा देखील उपयोग करून घोटाळा केला.

  स्थलांतरित कामगारांकडून उकळले पैसे

  सिन्हाने आपला सहाय्यक ओंकार वनकर याच्या मदतीने हा घोटाळा केला. गरजू आणि मुख्यतः बेरोजगार स्थलांतरित कमगारांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात आले. त्याबदल्यात त्यांचे खाते क्रमांक आणि आधार कार्डची माहिती घेण्यात आली.

  10-15 वर्षांपूर्वी बंद पडलेल्या मुंबईस्थित कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या नावाने पीएफ खाती उघडण्यात आली. 2014 पूर्वी उघडलेल्या पीएफ खात्यांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) काढण्याची तरतूद होती आणि पैसे काढताना तो नंबर तयार करणे अनिवार्य असे. नंतर ही सुविधा बंद करण्यात आली, याचाच फायदा आरोपीने घेतला. 2006 मध्ये बंद झालेल्या बी. विजय कुमार ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, लँडमार्क ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड, न्यू निर्मल इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या नावाचा त्याने यासाठी वापर केला.

  बँक खाती गोठवण्यासाठी पत्र

  दरम्यान घोटाळा उघडकीस आल्यानंतर पीएफ कार्यालयाच्या वतीने लेखापरीक्षणाची व्याप्ती वाढवण्यात आली असून, कार्यालयीन प्रणालीच्या वापराबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बँकांना ही 817 बँक खाती गोठवण्यासाठी पत्र देखील पाठवण्यात आले आहे.