कल्याणात सुरू झाला ‘फिरत्या वाचनालया’चा अनोखा उपक्रम ; वाचन संस्कृती जपण्यासाठी मिलिंद चव्हाण यांचा पुढाकार

'ग्रंथ आपल्या दारी- फिरते वाचनालय' उपक्रमांतर्गत महापुरुषांची आत्मचरित्र, सत्यकथा, कादंबरी, प्रेरणाकथा अशा विविध प्रकारची तब्बल २२८ पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

कल्याण : मोबाईल आणि इंटरनेटच्या काळात काहीशा मागे पडत चाललेल्या वाचन संस्कृतीला नविन ऊर्जा देण्यासाठी कल्याणात ‘ग्रंथ आपल्या दारी’ या फिरत्या वाचनालयाचा अनोखा उपक्रम सुरू झाला आहे. कल्याणातील युवा समाजसेवक मिलिंद चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत त्याची सुरुवात करण्यात आली.

खासदार असण्यापेक्षा आपण एक वाचक आहोत ही ओळख आपल्यासाठी सर्वात मोठी आणि महत्वाची असल्याचे मत खासदार कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. पुस्तकांची सर कशालाही येणार नसल्याचे सांगत वाचकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देण्याचे आवाहनही खासदार पाटील यांनी केले.

‘ग्रंथ आपल्या दारी- फिरते वाचनालय’ उपक्रमांतर्गत महापुरुषांची आत्मचरित्र, सत्यकथा, कादंबरी, प्रेरणाकथा अशा विविध प्रकारची तब्बल २२८ पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये कुसुमाग्रज यांचे वादळवेल, रणजित देसाई यांचे गंधाली, प्रविण दवणे यांचे तिचं आकाश, मंगेश पाडगावकरांचे शर्मिष्ठा, बाबा भांड यांचे आनंदघन, नागनाथ कोतापल्ले यांचे मध्यरात्र, प्रकाश आमटे यांचे प्रकाशवाटा, वि.वा. शिरवाडकरांचे कौंतेय, स्वामी विवेकानंदांचे यशशिखर, बाबासाहेब पुरंदरेंचे जाणता राजा, प्रा. नामदेवराव जाधव यांचे शिवाजी द मॅनेजमेंट गुरू आदी पुस्तकांचा समावेश आहे.

लॉकडाऊनच्या काळात आणि आताही लोकांनी सोशल मिडिया, वेबसिरीज आदींचा पुरेपूर वापर केला. आपल्याकडे वाचनाची मोठी परंपरा असून मोठा वाचक वर्गही उपलब्ध आहे. अनेक दिग्गज व्यक्तींनी मोठमोठे ग्रंथ, कादंबऱ्यांची पुष्कळ ग्रंथसंपदा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. याचा काहीसा विसर पडत चालला असून लोकांना त्याची महिती होण्यासाठी आणि वाचन संस्कृती टिकवण्यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती मिलिंद चव्हाण यांनी दिली. तसेच सध्या केवळ कल्याण पश्चिमेत हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ८८६६३८८१८१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मिलिंद चव्हाण विचार मंच आणि चव्हाण प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी बाबा जोशी, शिवसेनेचे जयवंत भोईर, भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, वरुण पाटील, वैशाली पाटील, चव्हाण प्रतिष्ठानचे साहेबराव चव्हाण, सुनील चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.