विश्वस्त पदासाठी महिलेचा अर्ज योग्यच; बॉम्बे पारसी पंचायतला निवडणुकीत सहभागी होऊ देण्याचे न्यायालयाचे निर्देश

बॉम्बे पारशी पंचायती (बीपीपी) च्या विश्वस्त पदासाठी डॉ. झुलेका होमावजीर यांनी प्रस्तावक (प्रपोजर) म्हणून आर.एन. जिजीभॉय यांच्याकडे पहिला आणि खोर्शेद दादी अँटिया यांच्याकडे दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवार म्हणून आपले नाव सुचवण्याची विनंती करण्यापूर्वी प्रस्तावक सदस्य हे पारशी समुदायाचे आहेत की नाही याची शहानिशाही केली होती.

    मुंबई : विश्वस्त पदाच्या निवडणूकीसाठी प्रस्तावक (प्रपोजर) हा पारशी आहे का नाही याची पडताळणी करणे हे पंचायतीचे काम आहे, उमेदवाराचे नाही. त्यामुळे बॉम्बे पारशी पंचायतीचा (बीपीपी) दावा चुकीचा असल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने रिक्त झालेल्या विश्वस्त पदासाठी १४ मार्च (आज) रोजी होणाऱ्या निवडणुकीत सहभागी होण्यास याचिकाकर्त्यां पात्र असल्याचे स्पष्ट केले आणि त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले.

    बॉम्बे पारशी पंचायती (बीपीपी) च्या विश्वस्त पदासाठी डॉ. झुलेका होमावजीर यांनी प्रस्तावक (प्रपोजर) म्हणून आर.एन. जिजीभॉय यांच्याकडे पहिला आणि खोर्शेद दादी अँटिया यांच्याकडे दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवार म्हणून आपले नाव सुचवण्याची विनंती करण्यापूर्वी प्रस्तावक सदस्य हे पारशी समुदायाचे आहेत की नाही याची शहानिशाही केली होती.

    त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रस्तावक जिजीभॉय यांनी झोरास्ट्रियनचा (पारशी धर्माचा) त्याग करून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे पंचायत अधिकाऱ्यांनी होमावजीर यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अँड. राजीव सिंह यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी पार पडली.

    जिजीभॉय यांनी पारशी धर्माचा त्याग केला असे गृहीत धरले तरी त्यांचे नाव अद्यापही बीपीपीच्या रजिस्ट्ररमधून काढून टाकण्यात आले नाही. वास्तविक बीपीपीच्या निवडणूक प्रक्रियेनुसार, विश्वस्त पदासाठी अर्ज दाखल करणारा उमेदवार पारशी धर्मीय आहे अथवा नाही, याची पडताळणी प्रस्तावकाकडून होणे गरजेचे असते. या प्रकरणात ही प्रक्रिया नेमकी उलट घडलेली आहे. तसेच जर बीपीपीच्या अधिकाऱ्यांना जिजीभॉय यांच्याविषयी साशंकता होती, तर त्यांना ३० दिवसांची नोटीस देऊन पडताळणी करणे गरजेचे होते.

    मात्र, या प्रक्रियेचे अधिकाऱ्यांकडून पालन झाले नाही. त्यामुळे डॉ. होमावजीर यांची उमेदवारी रद्द करणे अवैध होते असा दावा अँड. सिंह यांनी खंडपीठासमोर केला. त्याची दखल घेत प्रस्तावक जिजीभॉय यांनी झोरास्ट्रियनचा त्याग केल्याचा कोणताही पुरावा बॉम्बे पारशी पंचायत सदस्य सादर करू शकले नाहीत. तसेच योग्य प्रक्रियेचे पालन न करताच उमेदवारी रद्द केली हा निर्णय अयोग्य असल्याचे आपल्या आदेशात नमूद करत न्यायालयाने बीपीपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायतला याचिकाकर्त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश दिले.