परमबीर सिंग यांची एसीबी करणार खुली चौकशी; गृहविभागाची परवानगी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने दिली आहे. लाचलुचपत प्रबंधक विभागाने(एसीबी) पोलिस निरिक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारीप्रकरणी सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृह विभागाकडे मागितली आहे. त्यामुळे आता एसीबीला सिंग यांच्याविरोधात चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृहविभागाने दिली आहे. लाचलुचपत प्रबंधक विभागाने(एसीबी) पोलिस निरिक्षक अनुप डांगे यांच्या तक्रारीप्रकरणी सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी करण्याची परवानगी गृह विभागाकडे मागितली आहे. त्यामुळे आता एसीबीला सिंग यांच्याविरोधात चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    डांगे यांच्या तक्रारीनुसार, 23 नोव्हेंबर 2019 ला गावदेवी येथील डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी तेथे दोन गटांमध्ये सुरू असलेल्या मारहाणीप्रकरणी प्रसिद्ध हिरे व्यापारी व निर्माता भरत शहाचा नातू यश, याचे दोन मित्र व तीन विरोधक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी कारवाई करण्यासाठी गेलेले पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. त्यात पवार यांचा गणवेशही फाटला होता.

    त्यानंतर इतर पोलिसांनी मध्यस्थी करून पवार यांची सुटका केली व यश व त्याच्या काही मित्रांना घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणात जीतू नवलानीचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले होते. डांगे यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंध व त्यांच्यावर टाकण्यात आलेल्या दबावाप्रकरणी, तसेच भष्टाचाराप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीनंतर हे प्रकरण महासंचालक संजय पांडे यांच्याकडे चौकशीसाठी सुपूर्द करण्यात आले होते.