दांडीबहाद्दर शिक्षकांवरही होणार कार्यवाही

-मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय

 मुंबई : काहीही न कळवता दीर्घ कालावधीसाठी अनुपस्थित राहणार्‍या पालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर कार्यवाहीचा बडगा उगारण्याचा निर्णय शिक्षणाधिकार्‍यांनी घेतला आहे.

शिक्षण विभागातील बरेच शिक्षक व कर्मचारी अनेक महीने अनुपस्थित राहतात. त्यामुळे अनेक प्रशासकीय कामे प्रलंबित राहतात. 

शिक्षण विभागातील बरेच कर्मचारी दीर्घकालासाठी अनुपस्थित असतात. त्यामुळे आस्थापनेवर असलेल्या कर्मचार्‍यांच्या रजा विहित वेळेत मंजूर न झाल्याने त्यांचे सेवाअभिलेख अद्ययावत होत नाहीत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचे दावे प्रलंबित राहत आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत शिक्षणाधिकार्‍यांनी अनधिकृतरित्या गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबत मुख्याध्यापकांना दर महिन्याच्या शेवटी अहवाल देण्याचे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी मुख्य कार्यालय, माध्यमिक शाळा विभाग कार्यालय, खासगी प्राथमिक शाळा विभाग कार्यालय, शाळा प्रशासकीय अधिकारी विभाग कार्यालय, शारिरीक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी किंवा चतुर्थश्रेणी कर्मचारी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस न कळविता गैरहजर राहिल्यास मुख्याध्यापक किंवा संबंधित कार्यालयातील हजेरी नोंदवणार्‍या अधिकार्‍याने त्या व्यक्तीच्या  रहात्या पत्यावर पत्र पोस्ट, व्हाटसअ‍ॅप आणि मेलच्या माध्यमातून पत्र पाठवून हजर होण्याबाबत कळवावे, या व्यतिरिक्त रजेचा अर्ज न दिल्यास दोन स्मरणपत्र देऊन कारणे दाखवा नोटीस देण्याकरीता संबंधित आस्थापना उपविभागाला त्वरित कळवावे. तसेच वेतन बंद करण्याबाबत शिफारस करावी अशा कडक सूचना शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिल्या आहेत.