रक्तपेढ्यांवर कारवाईचा बडगा

मुंबई : राज्यातील २५ ते ३० टक्के रक्तपेढ्या राज्य रक्त संक्रमण परिषदेला ई-रक्तकोष कोणत्याही प्रकारची माहिती कळवत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. तसेच काही रक्तपेढी रक्तासाठी गरजू लोकांना जास्त पैसे आकारात आहेत. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदने मुंबईतील २० रक्तपेढ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविल्या आहेत.

रक्तपेढ्यांकडून नियमित दरापेक्षा जास्त पैसे आकारले जातात. या संदर्भात काही तक्रारी एसबीटीसीकडेही आल्या आहेत. रक्तपेढ्यांद्वारे रूग्णांवर जास्त भार पडण्याची ही पहिली वेळ नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता एसबीटीसीच्या रक्तपेढींकडूनही जाब विचारण्याची मागणी केली जात आहे. या वृत्ताला दुजोरा देत एसबीटीसीचे प्रमुख डॉ अरुण थोरात म्हणाले की, रूग्णांकडून अधिक पैसे घेण्याच्या बाबतीत सुमारे २० रक्तपेढींना नोटीस पाठविली आहे. तर मार्च ते ऑगस्ट या कोरोनाच्या सहा महिन्यात ४ लाख ७७ हजार ६१३ युनिट रक्त संकलन झाले. मात्र प्रत्यक्षात हा आकडा अधिक आहे. राज्यामध्ये तब्बल ३४१ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांना दररोज सकाळी १० ते ११ दरम्यान त्यांच्याकडील रक्ताचा साठा राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या ई – रक्तकोष या संकेतस्थळावर अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. पोर्टलवर माहिती मिळत नसल्याने रक्तसाठ्यासंदर्भातील योग्य माहिती परिषदेला उपलब्ध होत नाही. रक्तसाठ्यासंदर्भातील माहिती अपडेट करण्याबाबत इंटरनेटची समस्या, डेटा इंट्री करणारी व्यक्ती नाही अशी अनेक कारणे रक्तपेढ्यांकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या नागरिकाला रक्त पुरवठा करण्यात अडचणी येतात. वारंवार सूचना करूनही रक्तपेढ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर परिषदेने रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
रक्तपेढ्यांच्या स्पष्टीकरणाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. कोणतीही रक्तपेढी जर रुग्ण व त्याच्या कुटूंबाकडून निश्चित दरापेक्षा जास्त पैसे घेत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले.