कोरोनाची लागण झाल्याने अभिनेता सचिन जोशीची उच्च न्यायालयात धाव; खाजगी रुग्णालयात उपचाराच्या परवानगीची मागणी फेटाळली

आर्थिक फेरफार प्रकरणी सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) कडून अटक केल्यानंतर जामीन मिळालेल्या मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने कारागृहात असलेल्या अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याला कोरोनाची लागण झाली असून खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्याने दाखल केली असून त्याची मागणी फेटाळून लावत त्याला कारागृहातील विलगीकऱणातच उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

    मुंबई : आर्थिक फेरफार प्रकरणी सक्तसवसुली संचलनालयाकडून (ईडी) कडून अटक केल्यानंतर जामीन मिळालेल्या मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने कारागृहात असलेल्या अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याला कोरोनाची लागण झाली असून खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका त्याने दाखल केली असून त्याची मागणी फेटाळून लावत त्याला कारागृहातील विलगीकऱणातच उपचार घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

    ओमकार ग्रुप प्रमोटर्स आणि सचिन जोशीकडून करण्यात आलेल्या १०० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी सचिन जोशीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले होतं. मात्र समन्स बजावल्यानंतही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. यानंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सचिन जोशीला वैद्यकीय कारणास्तव सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

    मात्र, त्या आदेशाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे सचिन जोशी आर्थर रोड कारागृहात आहे. त्यातच २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपल्याला कोरोनावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालायात उपचार घेण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्याने याचिकेतून केली आहे.

    त्यावर सोमवारी न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली. त्याच्या मागणीला ईडीच्यावतीने बाजू मांडताना अँड. हितेन वेणेगावकर यांनी विरोध केला. त्याची दखल घेत न्यायालयाने आर्थर रोड कारागृहातील विलगीकऱण कक्षातच उपचार घेण्याचे निर्देश देत सचिन जोशीची मागणी फेटाळून लावत सुनावणी ५ मेपर्यंत तहकूब केली.