मुंबईकरांच्या चिंतेत भर; रुग्ण दुपटीचा कालावधी ४० दिवसांवर

  मुंबई : मुंबईत रोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही घसरत असल्याने चिंता वाढते आहे. रोजची रुग्णसंख्या ११ हजारावर पोहचली असून रुग्ण दुपटीचा कालावधी ४० वर घसरला आहे.

  मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या शनिवारी दिवसभरात ९०९० रुग्ण आढळले. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी ४४ दिवसांवर होता. त्यानंतर दुस-या दिवशी म्हणजे रविवारी रुग्णसंख्या तब्बल २,०७३ ने वाढून १११६३ वर गेली. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी घसरून ४२ वर आला. सोमवारी रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन ९८५७ झाली. रुग्ण दुपटीचा कालावधी मात्र कमी होऊन ४० वर आला. त्यामुळे रोजची वाढणारी रुग्णसंख्या आणि घसरणारा रुग्ण दुपटीचा कालावधी चिंतेत भर टाकणारा आहे. कोरोनाने कहर केल्याने राज्य सरकारने सोमवारी रात्री पासून कडक निर्बंध लागू केले आहेत.

  दरम्यांन ब्रेक दी चेन साठी अत्यावश्यक सेवा वगळून बंद करण्याचा नियम जारी केला आहे. शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण राहिल या दृष्टीने कडक निर्बंध जारी करण्यात आले. आहे. पालिकेने चाचण्यांचे प्रमाण – क्लोज कॉन्टॅक्टचा तात्काळ शोध, नियमांची कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रोजच्या चाचण्या ३० ते ३५ हजारापर्यंत केल्या जात आहेत. तसेच रुग्णांमागे १५ क्लोज कॉन्टॅकला क्वारंटाईन करण्यात येत आहे. नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.

  अशी वाढली रुग्णसंख्या –
  १ एप्रिल – ८६४६
  २ एप्रिल – ८८३२
  ३ एप्रिल – ९०९०
  ४ एप्रिल – १११६३
  ५ एप्रिल – ९८५७

  असा घसरला रुग्ण दुपटीचा कालावधी –

  १ एप्रिल – ४९ दिवसांवर
  २ एप्रिल – ४६ दिवसांवर
  ३ एप्रिल – ४४ दिवसांवर
  ४ एप्रिल – ४२ दिवसांवर
  ५ एप्रिल – ४० दिवसांवर