आदित्य ठाकरेंची दिलगीरी, मोफत लसीकरणाचं ट्विट डिलीट; गोपीचंद पडळकरांचा संताप

  मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. याचं पार्श्वभूमीवर देशातील लोकांना मोठ्या संख्येने लस दिली जावी, यासाठी 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांच्या लसीकरणासाठीही परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 1 मे पासून 18 वर्षापुढील युवकांनाही कोरोनाची लस मिळणार आहे. कोविशील्ड लसीच्या किंमतीवरुन वाद निर्माण झाला आहे. पण, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांना लस मोफत देण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. मात्र, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावरुन, भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

  आदित्य ठाकरे काय म्हणाले

  राज्यातील 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केलं. मात्र, आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन मोफत लसीकरणाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे म्हटले. आदित्य यांनी आपले ट्विट डिलीट करुन यासंदर्भात स्पष्टीकरणही दिलंय. त्यामध्ये, लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समितीमार्फत अधिकृतपणे जाहीर केले जाईल. लोकांमध्ये संभ्रम नको म्हणून मी यापूर्वीचे ट्विट डिलीट करतोय, असे आदित्य यांनी म्हटलंय.

  पडळकरांचा टोला

  दरम्यान, आदित्य यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये, नागरिकांना मोफत लस मिळणार असल्याचं म्हटलं होत. त्यावरुन, भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलंय. ‘बिघाडी सरकारचे लाडके मंत्री @AUThackeray  यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण, तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी जाहिर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत लसीकरणाचा’ निर्णय वापस घेऊ नये हीच अपेक्षा.

  केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे 45 च्या खालील लोकांना केंद्र सरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, कोविडशील्ड लसीचे दर केंद्रासाठी दीडशे रुपये, राज्याला 400 रुपये आणि खासगींना 600 रुपये असणार आहेत. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा 600 रुपये राज्यांना व 1200 रुपये खासगींना जाहीर झाली आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. त्यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यास होकार दिला होता, असे नवाब मलिक यांनी जाहीर केलं आहे.