दहिसर आणि मुलुंडमधील ‘जम्बो फॅसिलिटी’ची आदित्य ठाकरेंनी केली पाहणी

मुंबई :कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जम्बो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली

मुंबई :कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील काही ठिकाणी ‘जम्बो फॅसिलिटी’ अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. याच शृंखलेत आता प्रस्तावित ‘मुंबई मेट्रो’च्या पुढाकाराने दहिसर पूर्व येथे ९५५ खाटांचे; तर दहिसर पश्चिमेकडे कांधरपाड्याजवळ ११० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत १ हजार ९१५ खाटांचे उपचार केंद्र ‘सिडको’च्या पुढाकाराने उभारण्यात येत आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी दिवस-रात्र अव्याहतपणे सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. ही तिन्ही उपचार केंद्रे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतील.

 पाहणी दौऱ्यादरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) संजीव जयस्‍वाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त  विजय बालमवार, तिन्ही ठिकाणांशी संबंधित सहाय्यक आयुक्त आणि ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच ‘मुंबई मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल व ‘सिडको’चे  अश्विन मुद्गल आणि या संस्थांचेही संबंधित अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे देण्यात आली आहे. तर ही तिन्ही उपचार केंद्रे येत्या पावसाळ्यातील कमाल पर्जन्यमानाचा अंदाज बांधून त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेत उभारण्यात येत असल्याचीही माहिती संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली आहे.

सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांनी दहिसर पूर्व येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या ‘जम्बो फॅसिलिटी’ची पाहणी केली. या अनुषंगाने ‘मुंबई मेट्रो’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार याठिकाणी ९५५ खाटांचे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या ठिकाणी असणाऱ्या ९५५ खाटांपैकी ६४० खाटांना प्राणवायू  सुविधा उपलब्ध असणार आहे.  पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे यांनी दहिसर पश्चिमेला असणाऱ्या कांधरपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या ११० खाटांच्या प्रस्तावित दक्षता कक्षाची पाहणी केली. याठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या ११० खाटांपैकी ७७ खाटा या ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ अंतर्गत असणार आहेत. तर ३३ खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. तर उर्वरित १० खाटा या कोविड बाधित रुग्णांच्या डायलिसिस करिता राखीव असणार असून त्यांचा गरजेनुसार वापर केला जाणार आहे, अशी माहिती प्रस्तावित ‘मुंबई मेट्रो’च्या अधिकाऱ्यांद्वारे देण्यात आली आहे .
 
मुलुंड परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असणाऱ्या संशोधन समूहाच्या जागेत १ हजार ९१५ खाटांचे तात्पुरत्या स्वरूपातील परंतु मजबूत बांधणी असणारे उपचार केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचीही पाहणी करत तिथे सुरु असलेल्या कामाबद्दल ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. या ठिकाणी सुरुवातीच्या टप्प्यात एकूण खाटांपैकी ५० खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. त्यानंतर त्या ठिकाणची गरज लक्षात घेऊन अतिदक्षता कक्षाची क्षमता वाढविली जाणार आहे. उर्वरित १ हजार ८६५ खाटांपैकी किमान १ हजार खाटांना प्राणवायू सुविधा असणार आहे, अशीही माहिती यानिमित्ताने महापालिकेच्या ‘परिमंडळ ६’चे उपायुक्त  विजय बालमवार यांनी दिली आहे.