राज्यात म्युकोरमायकोसिस रुग्णसंख्येत वाढल्याने प्रशासन सर्तक ; या शहरांमध्ये आढळले इतके रुग्ण

काळ्या बुरशीच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन सावध आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये याचे रुग्ण आढळून येत आहेत. पुणे जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसने आतापर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. पुण्यात एकूण ३५३ म्युकोरमायकोसिस रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर हद्दीत आतापर्यंत ११ मृत्यू झाले आहेत.

    मुंबई: कोरोनाचा राज्यातील प्रादुर्भाव कमी होत असताना दुसरीकडे म्युकोरमायकोसिस (mucormycosis) ची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. काळ्या बुरशीच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासन सावध झाले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये याचे रुग्ण आढळून येत आहेत. पुणे जिल्ह्यात म्युकोरमायकोसिसने आतापर्यंत २० जणांचा बळी गेला आहे. पुण्यात एकूण ३५३ म्युकोरमायकोसिस रुग्ण आढळले आहेत. पुणे शहर हद्दीत आतापर्यंत ११ मृत्यू झाले आहेत. सुदैवाने २१२ रुग्ण म्युकोरमायकोसिस मधून बाहेर पडले आहेत. तर पुण्यात सद्यस्थितीत ११५ जणांवर उपचार सुरु आहेत.

    नागपूर,अमरावती, चंद्रपूरनंतर वर्ध्यातही म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३४रुग्ण आढळले आहे. यापैकी १३ रुग्ण सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात भरती असून ८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात एवढया मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

    सांगली जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ म्युकोरमायकोसिस या आजाराची साथ पाहायला मिळत आहे. यातील ६१ जणांना म्युकोरमायकोसिस आजार झाला आहे.यातील ४३जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. जालना जिल्हयात कोरोनासोबत आता म्युकोरमायकोसिसने शिरकाव केला आहे. जास्त काळ व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना म्युकोरमायकोसिसची लागण झाली आहे. जालन्यात सध्या म्युकोरमायकोसिसचे तब्बल ३३ रुग्ण आढळून आले आहेत. यातील १२जण या म्युकरमायकोसिस आजारातून मुक्त झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

    नागपुरातही म्युकोरमायकोसिसचा धोका वाढत आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आतापर्यंत ५३ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील १८रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे. नांदेडमध्ये म्युकोरमायकोसिस या आजाराचे ९२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १६जण दगावले आहेत. विशेष म्हणजे ५०जण या आजारातून उपचार घेऊन ठणठणीत बरे झाले आहेत. नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांचा यात समावेश आहे.

    अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या तब्बल ६१ रुग्णांवर उपचार आहेत. यासाठी लागणाऱ्या औषधांचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. हे इंजेक्शन शोधण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी हाल होत आहे.