मुंबई महापालिका इमारत
मुंबई महापालिका इमारत

पालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत ८० टक्केहून अधिक गुण मिळविल्यास प्रोत्साहनपर १० हजार रुपये दिले जातात. त्यामुळे आर्थिक मदतीत २५ हजारांपर्यंत वाढ करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

मुंबई (Mumbai).  पालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेत ८० टक्केहून अधिक गुण मिळविल्यास प्रोत्साहनपर १० हजार रुपये दिले जातात. त्यामुळे आर्थिक मदतीत २५ हजारांपर्यंत वाढ करण्यास प्रशासनाने नकार दिला आहे.

दिवसेंदिवस पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढला आहे. त्यामुळे पालक कर्ज काढून मुलांना खाजगी शिकवणी लावत आहे. परिणामी विद्यार्थ्यांची गळती वाढू लागली आहे. ती रोखण्यासाठी व संख्या वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवते. मनपाच्या शाळेत बहुतांश मुले कमी उत्पन्न गटातील असतात. शिक्षण घेताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न मनपा करते; परंतु प्रत्यक्षात ती मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे माध्यमिक शालांत परीक्षेत ८० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस पाच हजार रुपये दिले जातात. मात्र ही मदत अपुरी ठरत असल्याने पालिकेने २५ हजारांचे अर्थ साह्य द्यावे, जेणेकरून त्याच्या कुटुंबातील लोकांवर ताण पडणार नाही, मागणी नगरसेविका ज्योती भोसले यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती.

प्रशासनाने यावर अभिप्राय देताना, माध्यमिक शालांत परीक्षेत उच्च टक्केवारीने उत्तीर्ण होणाऱ्या महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळातील विध्यार्थ्यांना आणि अधिकतम निकाल देणाऱ्या माध्यमिक शाळांना अर्थसंकल्प तरतुदीनुसार बक्षिस स्वरूपात रोख रक्कम दिली जाते. शिक्षण समितीने तसा ठराव केला आहे. यात सन २०१५- १६ पासून ९५ टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांस १० हजार तर ९० ते ९४.९९ पर्यंत गुण मिळविणाऱ्या विध्यार्थ्यांस ५ हजार रुपये देण्यात येतात. तर समान गुण असल्यानंतरही विद्यार्थ्यांना स्वतंत्र मदत दिली जाते. त्यामुळे ८० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजारांचे अर्थ साह्य देणे अशक्य असल्याचे मत पालिका प्रशासनाने मांडले आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणे सध्या तरी दुरापास्त होणार आहे.