राज्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या वतीने राज्यातील 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व एकलव्य निवासी शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE),नवी दिल्ली यांचेशी संलग्न असून या शाळांमध्ये इ.6 वी ते 12 वी ( विज्ञान ) पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात.

    मुंबई : राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या 39 एकलव्य मॉडेल रेसीडेंशियल स्कूलमध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गात अनुसूचित/आदिम जमातीच्या विदयार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक / शिक्षक /मुख्याध्यापक यांनी या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आवेदनपत्र ऑनलाईन भरून प्रवेश घेण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या सदस्य सचिवांनी केले आहे.

    आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटीच्या वतीने राज्यातील 39 एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व एकलव्य निवासी शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE),नवी दिल्ली यांचेशी संलग्न असून या शाळांमध्ये इ.6 वी ते 12 वी ( विज्ञान ) पर्यंतचे वर्ग नैसर्गिक वाढीने सुरू करण्यात येतात. एकलव्य रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रतिवर्षी इ.6 वी च्या वर्गात एकूण 60 विद्यार्थ्यांना (30 मुले + 30 मुली ) नवीन प्रवेश देण्यात येतो,तसेच इ.7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांचा अनुशेष भरून काढण्यात येतो.

    या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील Student Id माहीत असणे आवश्यक आहे. राज्यातील विशेषत: शासकीय व अनुदानित आश्रमशाळेसह, जिल्हा परिषद,नगर पालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित / आदिम जमातीचे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

    शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता एकलव्य निवासी शाळेत इ.6 वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे इ.5 वी चे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे लागेल. राज्यातील कोणत्याही व्यवस्थापनाच्या शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परिक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार, पालकांचा मूळ राहण्याचा पत्ता विचारात घेऊन गुणानुक्रमे नजिकच्या एकलव्य शाळेत प्रवेश देण्यात येईल.

    राज्यातील अनुसूचित/ आदिम जमातीच्या ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. 6 लक्ष पेक्षा कमी आहे, अशा पालकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन आवेदन पत्र भरता येईल. प्रत्येक एकलव्य निवासी शाळेत इ.6 वी च्या प्रवेशामध्ये अनुसूचित जमातीच्या दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3% जागा तसेच आदिम जमातीच्या विद्यार्थ्यासाठी इ.6 वी च्या प्रवेशामध्ये एकूण 5 जागा आरक्षित राहतील.

    प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पालक,शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी प्रवेशासंदर्भातील अधिक माहितीसाठी नजिकच्या प्रकल्प कार्यालयास संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.