Admission to the five-year ‘Law’ course begins; Students were under stress as the admission process was not taking place

सीईटी सेलच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी अद्यापही विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला होत नसल्याने विद्यार्थी प्रचंड तणावाखाली होते.

    मुंबई : सीईटी सेलच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी अद्यापही विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला होत नसल्याने विद्यार्थी प्रचंड तणावाखाली होते.

    मात्र आता पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ६ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

    लॉकडाउन मुळे अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला आहे. त्यातच सीईटीच्या माध्यमातून राबवल्या जाणार्‍या प्रक्रियेलाही उशीर झाला होता. मात्र जानेवारीपासून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली तरी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात न झाल्याने विधीला प्रवेश घेणारे विद्यार्थी चिंतेत होते.

    मात्र, सीईटी सेलकडून ५ फेब्रुवारीला पहिली गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता संकेतस्थळावर जाहीर केली. त्यानुसार विद्यार्थ्यांना ६ फेब्रुवारीपासून निवड झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत जात प्रमाणपत्र सादर करण्याबरोबरच प्रवेश घेता येणार आहेत. त्यानंतर १५ फेब्रुवारीला दुसर्‍या गुणवत्ता यादीसाठी रिक्त असलेल्या जागांची यादी संकेतस्थळावर सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

    तर १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या अर्जामध्ये दुरुस्ती, कागदपत्रे अपलोड करणे किंवा नवीन अर्ज करता येणार आहे. दुसर्‍या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी अपलोड केलेल्या अर्जांची छाननी २० फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार असून, २३ फेब्रुवारीला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

    २४ ते २५ फेब्रुवारीदरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या तक्रारी करता येणार आहेत. त्यानंतर २ मार्चला दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.