ॲड. जयश्री पाटील यांच्या याचिकेमुळे दोन महिन्यात राज्य सरकारला दुसरा मोठा धक्का ! कोण आहेत जयश्री पाटील? त्यांची भुमिका काय?

मराठा आरक्षणाला विरोध आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना जयश्री पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते की, "माझा कोणत्याच जातीच्या आरक्षणाला विरोध नाही. पण जी गोष्टच मुळात घटनाबाह्य आहे तिला समर्थन कसे देणार? ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले तर तो  सर्वसाधारण वर्गावर होणारा अन्याय आहे. कोणाला आरक्षणाची गरज आहे, किंवा कोणाला नाही ही वेगळी बाब आहे, पण जी गोष्ट असंवैधानिक आहे तिला न्यायालयात आव्हान देणे गरजेच आहे कारण देश हा संविधानानुसार चालतो. कोणत्याही मोर्चा किंवा दडपशाहीने तुम्ही आरक्षण घेऊ शकत नाही किंवा कोणालाही दबाव आणू शकत नाही. न्यायालय हे नेहमी न्यायाच्या बाजून उभे असते."

  मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय सुनावत मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्दबातल ठरविले आहे. त्यामुळे मागील महिन्यात अनिल देशमुख प्रकरणात प्रकाश झोतात आलेल्या मुंबईतील वकील जयश्री पाटील यांच्याकडून या निर्णयामुळे राज्य सरकारला दुसरा मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. जयश्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख प्रकरणात आपल्या जीवाला धोका असल्याचे विधान केले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या अनेक प्रश्नाना उत्तरे दिली होती.

  मराठा आरक्षणाच्या तत्वाला विरोध

  ॲड जयश्री पाटील यांनी राज्यात मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर पहिल्यांदा त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते, ,मात्र येथे त्यांच्या विरोधात न्यायालयाने निर्णयाची पाठराखण करणारा निर्णय दिल्यांनतर श्रीमती पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात पर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले आणि फडणवीस सरकार जावून ठाकरे सरकार अस्तित्वात आले.

  कोण आहेत ॲड जयश्री पाटील?

  ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या ऍड जयश्री पाटील या कन्या आहेत. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागात प्रमुख पदावर सात वर्ष काम पाहिले, त्यांची मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

  घटनेच्या मूळ ढाचाला धक्का नको

  मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी न्यायालयात दाद मागितली त्यावेळी माध्यमांना माहिती देताना ज्येष्ठ वकील ऍड गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते की, “५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, घटनेच्या मूळ ढाचाला धक्का पोहचतो, या शुद्ध हेतूने जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांनी त्यावेळी असेही म्हटले होते की, श्रीमती पाटील यांचा फक्त अभ्यास नाही, तर त्या पलीकडे जाऊन त्या कायद्याचे चिंतन करतात. त्या चिंतनातूनच जेव्हा २०१८मध्ये मराठा आरक्षणाचे एस ई बी सी विधेयक मंजूर झाले तेंव्हा राज्यपालांकडे हरकत याचिका दाखल केली होती.”

  जातीच्या आरक्षणाला विरोध नाही

  मराठा आरक्षणाला विरोध आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना जयश्री पाटील यांनी त्यावेळी सांगितले होते की, “माझा कोणत्याच जातीच्या आरक्षणाला विरोध नाही. पण जी गोष्टच मुळात घटनाबाह्य आहे तिला समर्थन कसे देणार? ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले तर तो  सर्वसाधारण वर्गावर होणारा अन्याय आहे. कोणाला आरक्षणाची गरज आहे, किंवा कोणाला नाही ही वेगळी बाब आहे, पण जी गोष्ट असंवैधानिक आहे तिला न्यायालयात आव्हान देणे गरजेच आहे कारण देश हा संविधानानुसार चालतो. कोणत्याही मोर्चा किंवा दडपशाहीने तुम्ही आरक्षण घेऊ शकत नाही किंवा कोणालाही दबाव आणू शकत नाही. न्यायालय हे नेहमी न्यायाच्या बाजून उभे असते.”

  मराठा विरोधी प्रतिमा
  मराठा आरक्षणा विरोधात याचिकेनंतर तुम्ही माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात याचिका का दाखल केली असे विचारले तेंव्हा त्या म्हणाल्या होत्या की, “मी अनेक विषयांवर याचिका करते. माझे कामच जनहितार्थ याचिका दाखल करण्याचे आहे. आताही माझ्या वेगवेगळ्या याचिका न्यायालयांसमोर आहेत.” अनिल देशमुख यांच्याविरोधात जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती आणि उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेत लिहिले होते की, ‘अनिल देशमुख लोकांकडून, बिझनेसमनकडून शंभर कोटी वसूल करतात. ते स्वतः मराठा पुढारी आहेत, मसल पॉवर आहेत.

  भ्रष्टाचार हा कर्करोग आहे.

  इतकेच नाही तर शरद पवारांचा वरदहस्त त्यांच्या डोक्यावर आहे. पण ते ताकदवान नेते असले तरी त्यांना अभय नसावे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.’ याबद्दल त्या म्हणतात, “भ्रष्टाचार हा या देशाला, या राज्याला झालेला कर्करोग आहे. तो संपूर्ण समाजाला नष्ट करून टाकतो. त्यामुळे हा भ्रष्टाचार करणाऱ्या अनिल देशमुखांसारख्या नेत्यांच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. त्यांच्यासारखे मराठा नेते आपल्या पदाचा दुरुपयोग करतात.” त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की मलबार हिल पोलीस स्टेशनात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर खूप दबाव आणण्यात आला. स्वतः मराठा असूनही तुमची मराठाविरोधी अशी प्रतिमा का तयार झाली आहे? या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर दिले होते :

  मी भारतमातेची कन्या आहे, एका स्वातंत्र्यसैनिकाची कन्या आहे. मला जात नाही, मला जात समजतही नाही. माझ्या वडिलांनी मला जात दिली नाही. त्यामुळे मला त्या चष्म्यातून पाहाता येत नाही. मी फक्त संविधानाला मानते, आणि स्वतःला भारतीय समजते. मी कोणाच्या विरोधात नाही, कोणाच्या बाजूने नाही, फक्त संविधानानुसार चालते. त्यामुळे माझ्या जातीचा उल्लेख कोणीही करू नये असे माझे म्हणणे आहे.

  : ॲड जयश्री पाटील, मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्या