advertisement of Police recruitment will be in eight days Anil Deshmukh nrvb
आठ दिवसांत पोलिस भरतीची जाहिरात काढणार : अनिल देशमुख

भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात ५२९७ जागा भरण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसर्‍या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले.

  • एकूण १२५३८ जागांपैकी पहिल्या टप्प्यात ५२९७ जागा भरण्यात येणार

मुंबई : राज्यात येत्या आठ दिवसांत पोलिस भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून १२५३८ जागा भरण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. यासंदर्भात आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने घंटा नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान त्यांनी हे आश्वासन दिले. या भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात झाली असून पहिल्या टप्प्यात ५२९७ जागा भरण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसर्‍या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचेही ते म्हणाले.

ओबीसी महासंघाचे घंटानाद आंदोलन

मागील तीन ते चार वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्त्वात कारण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली बैठक

सुरवातीला हे आंदोलन गृहमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या जीपीओ चौकात होणार होते. परंतु पोलिस प्रशासनाच्या सुचनेवरून हे आंदोलन आकाशवाणी चौकात घेण्यात आले. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यलयात येणार असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली. त्या माहितीवरून आंदोलक हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेथून अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला. अखेर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक करण्यात आयोजित करण्यात आली.