फडणवीसांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जातेय – मलिक

ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

    मुंबई : भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकार्‍यांसोबत दिल्लीत बैठक घेतल्यानंतर मविआच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दिल्ली येथे आयपीएस आणि मुंबई येथेही काही अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी बैठका घेतल्याचे पुरावे असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे.

    ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. केंद्र सरकार या एजन्सींचा दुरुपयोग करत आहे. भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मंत्र्यांच्या विरोधात एक कहानी तयार करण्यात आली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

    पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नसल्याने ईडी आणि सीबीआय या एजन्सींच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम केले जात आहे. सुप्रीम कोर्टानेही ईडी आणि  सीबीआयच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. भाजपचे हे राजकारण जनता बघत असून येत्या काळात जनताच याचं उत्तर देईल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.