adar poonawala

सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला(adar poonawala) यांना कुणी धमकी दिली यावरून राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय गोंधळाला सुरूवात झाली आहे.

  मुंबई : सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला(adar poonawala) यांना कुणी धमकी दिली यावरून राज्याच्या राजकारणात नव्या राजकीय गोंधळाला सुरूवात झाली आहे. त्यातच शिवसेनेच्या नेत्यांनी धमकी दिल्याबाबतचे वृत्त देणाऱ्या एका वाहिनीचे संपादक अरूण पुरी यांना राज्याचे उद्योग मंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्र लिहून चुकीची बातमी दिल्याबाबत खुलासा मागितल्यानंतर संबंधित वाहिनीच्या वृत्त निवेदकाने व्टिट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

  धमकीवरून गोंधळात गोंधळ
  पुनावाला यांना धमकी दिल्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता नबाब मलिक यांनी लसींच्या दरावरून पुनावाला यांनी संभ्रम निर्माण केल्याचा आरोप केला. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या दराच्या कमिशन देण्यावरून काही वाद झाल्याने कुणी धमकी दिली का असा सवाल पुनावाला यांना पत्रकार परिषद घेवून केला. त्यामुळे राजकीय कोलाहल वाढला. मात्र त्याचवेळी एका वाहिनीवरून शिवसेनेच्या नेत्यांनी सिरमच्या प्रमुखांना धमकावल्याचे वृत्त देण्यात आल्याने याबाबतच्या गोंधळात भर पडली.

  सेनेचा खुलासा अन् वाहिनीची माफी
  शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी वृत्त वाहिनीच्या संपादकाना लिहीलेले पत्र माध्यमांना पाठविले. या पत्रात त्यांनी अन्य पक्षाच्या नेत्याचा उल्लेख केल्याने शिवसेनेची बदनामी होत असल्याचे कळविले. त्यानंतर वाहिनीचे वृत्त निवेदक राहूल कवल यांनी व्टिट करत आपण स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांचा सिरमला धमकावल्याची चित्रफित दाखवत शिवसेनेचा अनावधानाने उल्लेख केल्याचा खुलासा केला.

  त्यांनी व्टिट करत सांगितले की शिवसेनेची आद्याक्षरे एसएस आहेत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आद्याक्षरे एसएसएस आहेत, त्यामुळे चुकीने त्यांचा उल्लेख शिवसेनेचे नेते असा झाला.

  राजू शेट्टींचा इशारा
  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी सिरम मधून विदेशात आयात होणाऱ्या लसी जावू देणार नाही, असा इशारा देत राज्यात आणि देशात टंचाई असताना विदेशात कशासाठी लसी दिल्या जात आहेत, असा सवाल केला होता. काही वाहिन्यांनी शेट्टी यांच्या या विधानावरून सिरमला धमकावल्याचे वृत्त प्रसारीत करण्यास सुरूवात केली आहे