संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मला वनमंत्री करा बंजारा समाजाच्या या नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे- हरिभाऊ राठोड

  मुंबई: वादग्रस्त प्रकरणामुळे मंत्रिपदावरुन गच्छंती झालेल्या संजय राठोड यांच्या जागी मला मंत्री करा, अशी मागणी बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे पत्रही दिले आहे.

  काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्री झालो असतो
  या पत्रात हरिभाऊ राठोड यांनी सध्या रिक्त असलेल्या वनमंत्री पदावर दावा सांगितला आहे. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्याऐवजी मला मंत्री करा. तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. त्यामुळे आता वनमंत्रीपद मला द्यावे, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेणार, याकडे सार्‍यांच्या नजरा लागल्या आहेत.

  सत्तेचा वाटा देऊ असे उद्धव ठाकरेंचे वचन

  हरिभाऊ राठोड यांनी सात मार्च आणि अकरा मार्च अशी दोन पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेमध्ये बिनशर्त प्रवेश केल्याचे सांगत सत्तेत आल्यास खारीचा वाटा देऊ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची आठवणही हरिभाऊ राठोड यांनी करुन दिली आहे. आपण विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेच्या आमदारांना निवडूण आणण्यासाठी काम केल्याचे सांगून आपला संपर्क आणि काम प्रत्येक जिल्ह्यात आहे. आपण भटक्या विमुक्त जाती, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजाचे नेतृत्व केल्याचे सांगत हरिभाऊंनी आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा शिवसेनेला संपूर्ण राज्यात होईल, असे पत्रात म्हटले आहे.

  वनमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग

  सध्या हे खाते मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतःकडे ठेवले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकासआघाडीत लगेचच वनमंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु झाले होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रिपद मिळावे यासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत होते. तर मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर आहे.