bmc

संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार - जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची महापालिकेची सूचना देण्यात आली आहे. पाण्यात गाडी

संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार – जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत काच फोडता येईल असे साधन ठेवण्याची महापालिकेची सूचना देण्यात आली आहे.  पाण्यात गाडी अडकल्यास व ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन असणे अत्यंत गरजेचे आहे. २६ जुलै २०२० चा दुर्दैवी पूर्वानुभव लक्षात घेता कार किंवा जीप ची ‘विंडो’ काच फोडता येईल असे साधन गाडीमध्ये सहज हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवणे उपयुक्त आहे.  २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टी दरम्यान काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिम मध्ये पाणी गेल्यामुळे सदर यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे दुर्दैवी मृत्यू झाले होते.

गेल्या वर्षी २०१९ च्या पावसात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात दोन व्यक्तींचे दुर्दैवी मृत्यू झाले होते. ही बाब लक्षात घेऊन व अशी घटना टाळता यावी, यासाठी काही अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून आपल्या वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.  भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक ३ जून २०२० रोजी ‘निसर्ग’ चक्रीवादळ मुंबईत धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून सध्या मुंबईतील काही भागात पाऊस सुरू झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे. 

तथापि, काही आत्यंतिक गरजेपोटी घराबाहेर पडावयाचे झाल्यास व चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसेच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; असेही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे आवर्जून कळविण्यात येत आहे.