महाराष्ट्रातही केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन, हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आज धडकणार मुंबईत

आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला असून नाशिककडून मुंबईकडे कूच केलीय. मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी या मोर्चात सहभागी होऊन आपली भूमिका या आंदोलनाच्या व्यासपीठावरून स्पष्ट करणार आहेत. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना झालेत.

दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात आयोजित करणात आलेला शेतकरी मोर्चा आज (रविवारी) मुंबईत पोहोचणार आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला नैतिक पाठिंबा आणि बळ देण्यासाठी नाशिकपासून या मोर्चाला सुरुवात झालीय.

विशेषतः आदिवासी समाजातील शेतकऱ्यांनी दिल्लीतील मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला असून नाशिककडून मुंबईकडे कूच केलीय. मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी या मोर्चात सहभागी होऊन आपली भूमिका या आंदोलनाच्या व्यासपीठावरून स्पष्ट करणार आहेत. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारो शेतकरी मुंबईकडे रवाना झालेत.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. सुमारे ४५० वाहनांनी २० हजार शेतकरी मुंबईकडं रवाना झालेत. आज (रविवारी) रात्रीच्या सुमाराला मुंबईत हा मोर्चा दाखल होईल आणि त्यानंतर सोमवारी आझाद मैदानात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. 

मोर्चा जसजसा पुढं सरकेल, तसतसे शेतकरी या आंदोलनात सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय. कोरोना काळात देश संकटात असताना कुठल्याही चर्चेविना घाईघाईनं हा कायदा का करण्यात आला, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. राज्यातील १०० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या सभेत सहभागी होणार असून केंद्रीय कृषी कायद्यांना ते विरोध करणार आहेत. केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, या मागण्यांचं निवेदन राज्यपालांना देण्यात येणार आहे.