विमानतळ मुख्यालय गुजरातला पळविले; शिवसेना-मनसे अदानींवर संतप्त

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे मुख्यालय अदानी कंपनीने मुंबईतून अहमदाबादला हलवल्यानंतर त्यावर आता शिवसेना-मनसेने संताप व्यक्त केला आहे. त्यातच काँग्रेसनेही या प्रकरणात उडी घेत याचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडून वादात भर घातली. या मुद्यावर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली असून हे मुख्यालय मुंबईतच राहावे, अशी मागणी केली. मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीकेकडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावे यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचे मुख्यालय अदानी कंपनीने मुंबईतून अहमदाबादला हलवल्यानंतर त्यावर आता शिवसेना-मनसेने संताप व्यक्त केला आहे. त्यातच काँग्रेसनेही या प्रकरणात उडी घेत याचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडून वादात भर घातली. या मुद्यावर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेतली असून हे मुख्यालय मुंबईतच राहावे, अशी मागणी केली. मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीकेकडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावे यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

    मुंबई विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विमानततळ आहे आणि ते तसेच राहणार. महाराष्ट्राच्या राजधानीत ते विमानतळ आहे. जर कोणी अशा प्रकारे काही करत असेल तर त्यांनी फक्त ते छत्रपती शिवाजी महाराज नाव पाहावे असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

    आयजीच्या जिवावर बायजीचा उद्धार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार अशी वागणूक केंद्र सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. शिवसेना हे सहन करणार नाही. मुंबई विमानतळाचे मुख्यालय हे मुंबईतच राहील यासाठी शिवसेना आक्रमक राहील असे शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले.

    गरबा कराल तर…

    फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेले आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल असा इशारा मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिला.

    दांडिया नृत्य…

    हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरेच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या 7 वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्र असेच गुजरातला नेले. मुंबई विमानतळ आधी जीविके या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. जीविकेने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला.

    अहमदाबादचे महत्त्व वाढ‌विण्याचा प्रयत्न

    मुंबईचे अहमदाबाद करण्याचे हे काम सुरू आहे. मुंबई विमानतळाचे महत्त्व कमी करून अहमदाबादचे महत्व वाढवण्याचे हे काम आहे. त्यापेक्षा अहमदाबादला स्वतंत्र स्टेट्सचा दर्जा देऊन त्याचे महत्व वाढवावे, असा टोमणा विनायक राऊत यांनी हाणला. दरम्यान, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन सिंधुदूर्ग विमानतळ सुरू करण्याबाबत चर्चा केल्याचीही माहिती दिली. सिंधुदुर्ग विमानतळावर विमान उड्डाणासाठी विमानतळ प्राधिकरणच्या सुरक्षा अहवालाची प्रतिक्षा असून हा परवाना मिळवण्यासाठी 28 जूनला आयआरबीने अर्ज केला आहे. लगेच परवाना मिळाला तर गणेश चतुर्थीपूर्वी विमानतळ सुरू होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.