अजित दादा जरा सांभाळून बोला, मी बोलायला लागलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा इशारा

"अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे. जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल", असा थेट इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे अजित पवार आणि चंदक्रांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

    मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांभाळून बोलण्याचा थेट इशाराच दिला आहे. ते कोल्हापुरात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. महाराष्ट्र झोपेत असतानाच सरकार पडेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य झोपेत असताना केलं की जागं असताना असा मिश्कील टोला हाणला होता.

    दरम्यान त्यावर आता चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला. “झोपेत कसं सरकार आणायचं हे अजित दादांनाच चांगलं माहित आहे. खुद्द शरद पवार झोपेत असताना त्यांनी सरकार आणलं होतं हे ते विसरलेत का? ज्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही तीन दिवसांचं का होईना पण सरकार स्थापन केलंत त्यांच्यावर टीका करताना जरा तरी विचार करा”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    तसेचं पुढे बोलतांना म्हणाले की, “अजित दादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे. जर बोलायला लागलो तर तुम्हाला खूप महागात पडेल”, असा थेट इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला. त्यामुळे अजित पवार आणि चंदक्रांत पाटील यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

    मराठा आरक्षणासाठी आम्ही संभाजी राजेंसोबत

    “मराठा आरक्षणासाठी जो जो कुणी संघर्ष करतोय किंवा करेल त्यांच्यासोबत आम्ही आहोत. संभाजी राजे तर आमचे राजे आहेत. आता मवाळ भूमिका घेऊन चालणार नाही. उलट त्यांनी या सरकारवर दबाव आणून यांच्याकडून आरक्षण मिळवून घेतलं पाहिजे. कोरोना आहे म्हणून संघर्ष थांबवून काही होणार नाही. या सरकारच्या मागे लागून आरक्षण मिळवावं लागेल आणि त्यासाठी आम्ही मराठा समाजासोबत आहोत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.