ओळखी तर पवार साहेबांच्याही आहेत, मात्र असं वागणं बरं नव्हे, अजित पवारांची सुजय विखेंवर टीका

सुजय विखेंनी अशा प्रकारे इंजेक्शन्स आणणं आणि त्याचं वाटप करणं योग्य नसून ते सरकारकडे जमा करायला हवे होते, असं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं होतं. त्यावर सरकार कारवाई करेल, म्हणून गोपनियता बाळगल्याचं सुजय विखेंनी म्हटलं होतं. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय. 

    महाराष्ट्रात सध्या कोरोनाने उच्छाद मांडला असून रुग्णांची संख्या वाढत चाललीय. अशा परिस्थितीत रेमडेसिवीर इंजेक्शनन्सचा तुटवडा जाणवत असून त्याचा काळाबाजार सुरू असल्याचं चित्रही पाहायला मिळतंय. भाजप खासदार सुजय विखे यांनी नुकतीच विमानानं इजेक्शन आणून त्याचं मतदारसंघात वाटप केल्याचा मुद्दा जोरदार गाजला.

    सुजय विखेंनी अशा प्रकारे इंजेक्शन्स आणणं आणि त्याचं वाटप करणं योग्य नसून ते सरकारकडे जमा करायला हवे होते, असं उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं म्हटलं होतं. त्यावर सरकार कारवाई करेल, म्हणून गोपनियता बाळगल्याचं सुजय विखेंनी म्हटलं होतं. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय.

    कुठल्याही लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारे बेकायदेशीर वर्तन करणं योग्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. ओळखी तर शरद पवारांच्याही आहेत. त्यांनाही अनेकजण रेमडेसिवीर इंजेक्शन्स द्यायला तयार होते. मात्र ज्यांना पुण्यात इंजेक्शन पुरवणं शक्य आहे, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावं, मुंबईत शक्य आहे त्यांनी आयुक्तांकडं द्यावं, असे आदेश शरद पवारांनी दिल्याचं अजित पवारांना सांगितलंय. ओळखी आहेत, म्हणून त्याचा कसाही उपयोग करून घेणं चुकीचं असल्याचा टोला त्यांनी सुजय विखेंना लगावला.

    सुजय विखेंकडून चूक झाली असली, तरी आता इथून पुढे सर्व लोकप्रतिनिधींनी कायदेशीर बाबींचं भान राखूनच काम करावं, असा सल्लाही अजित पवार यांनी दिलाय.