तो एक शब्द बोलायला वडेट्टीवार विसरले अन् गोंधळ उडाला, लॉकडाऊनबाबतच्या गैरसमजावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाऊन(Lockdown) काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिलं होतं.

    विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटवल्याची घोषणा केली आणि गुरुवारी एकच गोंधळ उडाला. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. दरम्यान या सर्व गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी भाष्य केलं आहे. ते रायगडमध्ये (Raigad)  पत्रकार परिषदेत बोलत होते.

    “अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी करोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला होता असं स्पष्ट केलं आहे.  शेवटी सरकार कोणाचंही असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

    राज्यातील काही जिल्ह्यांत लॉकडाउन काढण्याचा प्रस्ताव असून त्यास आपत्ती व्यवस्थापन बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु मुंबईहून नागपूरला येण्याच्या गडबडीत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना तत्त्वत: हा शब्द विसरून गेलो असं स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिलं होतं.

    त्यानंतर पुन्हा शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल”.