अखिल भारतीय किसान महासभा महाराष्ट्र राज्य काउन्सिल बंदमध्ये सक्रिय सहभाग घेणार

अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंदमध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये 'बंद' यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन शाखांना केले आहे, अशी माहिती किसान सभेनं दिली आहे.

  मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडून ठार मारल्या प्रकरणाचे देशभरात तीव्र संताप उमटले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

  शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमी आंदोलन पुकारणाऱ्या किसान सभेने महाराष्ट्र बंदला  सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या अखिल भारतीय शेतकरी आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या मुलाचा समावेश असणाऱ्या वाहन ताफ्याने चिरडून मारले. या घटनेमुळे देशभरातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध पक्ष व संघटनांनी महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्यासाठी 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

  अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. किसान सभेच्या सर्व शाखा महाराष्ट्र बंदमध्ये अत्यंत सक्रियपणाने सहभागी होत आहेत. किसान सभेचे काम आलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये गाव, शहर, तालुका व जिल्ह्यामध्ये ‘बंद’ यशस्वी करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष व संघटनांच्या तातडीने बैठका घेऊन बंदचे नियोजन करण्याचे आवाहन शाखांना केले आहे, अशी माहिती किसान सभेनं दिली आहे. ‘जनतेनं या बंदमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेकडून करण्यात आलं आहे.

  तसेचं मुंबईतील चाकरमान्यांना डब्बा पुरवणाऱ्या मुंबईतील डब्बेवाल्यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या बंदला पाठिंबा दिला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून हा बंद असणार आहे. त्यामुळे बंद जरी सुरू असला तरी काम सुरू राहणार आहे, असंही डब्बेवाला संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

  एसटी आणि बेस्ट बस सेवा बंद राहणार

  लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदची उद्या हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदची तयारी होत आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद राहणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.